चंद्रपूर - विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेला विजय ( BJP Won MLC Election ) म्हणजे महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या केलेल्या छळाचे परिणाम असल्याची टीका पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर ( Minister Of State Hansraj Ahir ) यांनी केली आहे.
'तरीही भाजपाचा सामना करणे शक्य झाले नाही' -
शिवसेना-काॅंग्रेस-राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लढूनही त्यांना भाजपाचा सामना करणे शक्य झाले नाही. एकट्या भाजपाने या सर्वांना धुळ चारली असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. ओबीसींचा छळ कराल, तर हेच परिणाम पुढेही भोगावे लागतील, असा इशाराही हंसराज अहीर यांनी संबंधित पक्षांना दिला आहे. या निवडणुकीत निवडून आलेले भाजपाचे नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे (नागपूर), वसंत खंडेलवाल (अकोला-बुलडाणा-वाशिम), अमरीश पटेल (धुळे-नंदुरबार), राजहंस सिंह (मुंबई) यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
'तर सरकारही पडेल' -
मनपा, न.प., जि.प., क्षेत्रातील ओबीसी जनप्रतिनिधी असलेल्या मतदारांनी तसेच काही मतदारसंघात सत्तापक्षाच्या ओबीसी नगरसेवकांनी सत्तारुढ सरकारवर ओबीसी अन्यायाबाबत रोष व्यक्त केला असल्याचेही अहीर यांनी म्हटले आहे. ओबीसी विरोधात अशीच भूमिका राहीली तर सरकारही पडेल, असे सांगून या विजयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे भरीव योगदान राहिले आहे. सबका साथ-सबका विकास-ओबीसींना सन्मान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हा विश्वासच आहे, असेही अहीर यांनी म्हटले.
हेही वाचा - Omicron Patients In Maharashtra : राज्यात ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या 28 वर