चंद्रपूर : लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय बंद असताना लोकांना भरमसाठ वीजबिल आले. हे बिल सरसकट माफ करण्यात यावे आणि पुढे 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात यावी. या मागणीसाठी आज(शुक्रवार) गडचांदूर येथे 'वीजबिल वापसी आंदोलन करण्यात आले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
गडचांदुर येथील महावितरण कार्यालयात नागरिकांनी प्रशासकीय नियम पाळत आपले आलेले वीजबिल परत केले. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, 200 युनिटपर्यंत वीज पुरवठा मोफत करण्यात यावा, अशी मागणी यावेळेस करण्यात आली. विजेचा उत्पादन खर्च अडीच रुपये असताना घरगुती वापराकरता सरासरी साडेसात रुपये बिलाची आकारणी केली जाते आणि औद्योगिक वापराकरिता 11.50 रुपये दर आकारले जातात. ही दोन्ही दरे निम्मे करण्यात यावी. गेल्या तीन वर्षांपासून विदर्भात दुष्काळ असल्यामुळे शेतीपंपाचे सर्व थकीत वीजबिल माफ करण्यात यावे. शेतीला पूर्णवेळ पूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी. मागेल त्याला तत्काळ वीजपुरवठा करण्यात यावा. विदर्भातील लोडशेडींग संपविण्यात यावे, या मागण्यासाठी आंदोलन झाले.
यावेळी शेतकरी संघटनेचे प्रभाकर पा. दिवे, मदन सातपुते, दीपक चटप, प्रवीण एकरे, आशिष पा. मुसळे, वामनराव पा. बोबडे, अरुण पा. रागीट, कालीदास पा. उरकूडे, दिलीप पा. आस्वले, वासुदेव पा. गौरकार, स्वप्नील झुरमुरे आदी उपस्थित होते. विदर्भातील ११ जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आले.