चंद्रपूर - राज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी पोचविण्याची तयारी झाली आहे. यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून विद्यार्थ्यांना निः शुल्क बससेवा पुरविण्यात येणार आहे. जो निधी लागणार आहे तो मदत व पुनर्वसन मंत्रालयातून पुरविला जाणार आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
राज्यातील अनेक ठिकाणाहून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी लॉकडाऊनमुळे तिथे अडकले आहेत. पालकांना त्यांची चिंता वाटत आहे. अशा वेळी या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठीचे नियोजन आखण्यात आले आहे. राज्यात अडकलेल्यांना एसटीद्वारे त्यांच्या घरी पोहोचवले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने त्यांना पोचविले जाणार आहे.
यासाठी जवळपास 10 हजार बसेसची आवश्यकता आहे. मात्र, मंडळाकडे संपूर्ण खर्च उचलण्या इतका निधी नाही. याद्वारे बसेस पुरविलेल्या जाऊ शकतात मात्र इंधनाचा प्रश्न कायम होता. यावर मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तोडगा काढला आहे. यासाठी लागणारा निधी हा मदत व पुनर्वसन विभागाद्वारे देण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचा आराखडा तयार झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संमती मिळताच उद्या किंवा परवापासून या विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती वडेट्टीवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.