चंद्रपूर - राजुरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या मूर्ती येथे विमानतळ निर्मितीला युती सरकारने मंजुरी दिली होती. त्यासाठी विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून ४६ कोटी रुपये जमीन संपादनासाठी दिले आहेत. मात्र, आता मूर्तीचे विमानतळ भद्रावती येथे हस्तांतरित करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. मात्र, या मागणीला माजी आमदार अॅड. संजय धोटे यांनी विरोध केला आहे.
मूर्ती येथील विमानतळाला भाजप सरकारने मंजुरी दिली होती. विमानतळासाठी जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या प्रस्तावित विमानतळामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रात उद्योगात चालना मिळणार आहे. मात्र, आता महाविकास आघाडी सरकारने युती सरकारच्या योजनांना कात्री लावण्याचे धोरण अंमलात आणले आहे, असेही ते म्हणाले.
दारूबंदीसाठी रस्तावर उतरू -
राज्यातील ठाकरे सरकारने महसूलवाढीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. चंद्रपूरचा पालकमंत्र्यानी दारूबंदीची समीक्षा करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. याला आमचा तीव्र विरोध आहे, असे धोटे म्हणाले. तसेच सरकारच्या निर्णयाविरोधात प्रसंगी रस्तावर उतरण्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.