राजूरा (चंद्रपूर) - दहा लोकांचा बळी घेणाऱ्या आर.टी.वन. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न सूरू आहेत. सतत हुलकावणा देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता सापळा रचला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यासाठी चक्क पिंजऱ्यामध्ये वनपाल, वनमजूरांना बसविण्यात आले आहे.
तर दुसऱ्या पिंजऱ्याची दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे. वाघ पिंजऱ्याचा आत शिरताच ही दोरी ओढली जाणार आहे. दोरी ओढताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होणार आणि वाघ पिंजऱ्यात अडकणार आहे. यात वनपाल, वनरक्षकांच्या जीवितास धोका नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत असले तरी वनविभागाच्या या थरारक खेळीने वनमजूर, वनपालांचे कुटूंब हादरले आहे.
राजूरा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आर. टी. वन. वाघाने आतापर्यंत दहा जणांचे बळी घेतले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी जंगलात 160 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच 200 वन कर्मचाऱ्यांचा ताफा जंगलात गस्त घालत आहेत. वाघाला बेशुध्द करण्यासाठी दोन शुटरही तैनात करण्यात आले आहेत. दिवस-रात्र वन कर्मचारी वाघावर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, प्रत्येक वेळी हा वाघ हुलकावणी देत आहे.
वनविभागाने वाघाला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात जनावरेही ठेवली होती. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. तर दुसरीकडे वाघाला ठार करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूरांनी रास्ता रोको आंदोलनही केले. त्यामुळे वनविभागावर दबाव वाढला आहे. यातूनच वनविभागाने आता "जिवघेणी" खेळी खेळली आहे.
वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. वाघाला पकडण्यासाठी मुख्य पिंजरा असणार आहे. या पिंजऱ्यापासून 30 ते 40 मिटर अंतरावर उंच ठिकाणी दुसरा पिंजरा ठेवला गेला आहे. या पिंजऱ्यात आळीपाळीने 16 वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसणार आहेत. मुख्य पिंजऱ्याचा दरवाजाला बांधलेली दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे. मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच ही दोरी ओढली जाईल. दोरी ओढताच मुख्य पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल आणि वाघ पिंजऱ्यात अडकेल. दुसरा पर्याय म्हणून जाळीसुद्धा बांधण्यात आली आहे.
या योजनेत पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या जिवाला कुठलाच धोका होणार नसल्याचे वनविभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मात्र, परतीच्या पावसाच्या या दिवसांत रात्रभर पिंजऱ्यात बसविणे कितपत योग्य आहे? याबाबत चर्चा होत आहे.