चंद्रपूर - शेतात काम करत असताना वीज पडल्याने एक महिला ठार झाल्याची घटना राजुरा तालुक्यातील भेंडवी येथे घडली आहे. सुनंदा सुधाकर बावणे असे मृत महिलेचे नाव आहे. गडचांदूर परिसरात त्या वास्तव्यास आहेत. पोटापाण्यासाठी सुनंदा बावणे भेंडवी येथे सलाम यांच्या शेतात कापूस बियाणे टिपायला जातात. त्यांच्यासोबत गडचांदूरमधील नऊ आणि भेंडवीतील सात महिला याच ठिकाणी काम करतात.
आज शेतकामा दरम्यान मुसळधआर पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतानजीकच्या गोठ्याकडे महिलांनी धाव घेतली. याच दरम्यान सुनंदा बावणे यांच्या अंगावर वीज कोसळली. सुनंदा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोन वर्षापूर्वीच सुनंदा यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांचा पालणपोषणाची जबाबदारी सुनंदा यांच्यावरच होती. त्यांच्या जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. या प्रकरणी अधिक तपास राजुरा पोलीस करत आहेत.
ऐन खरीप हंगामात बैलावर 'वीज'
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथे सोमवारी मुसळधार पावसादरम्यान बैलावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सध्या पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे. गोजीली येथील शेतकरी संजय शंकर मोहूर्ले बैलजोडी घेऊन शेतात काम करत होते. पावसाला सुरुवात झाल्याने मोहूर्ले यांनी नांगरणी बंद केली; आणि बैलांना सोडून दिले. पावसाने जोर पकडल्याने बैल घराच्या दिशेने निघाले. याच दरम्यान एका बैलाचा अंगावर वीज कोसळली.