चंद्रपूर - बल्लारपूर शहरातील वेकोली वसाहत परिसरात वडिलांनी मुलांना गोळ्या घालून स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील भगतसिंग वार्ड येथे राहणारे मुलचंद द्विवेदी (वय-५०) यांनी पोटच्या दोन मुलांवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडली. आकाश द्विवेदी (वय २२) आणि पवन द्विवेदी (वय २०) अशी या दोन मुलांची नावे आहेत. संबंधित प्रकार घरघुती वादावरून घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मुलचंद द्विवेदी यांनी आधी आकाशच्या छातीत गोळी झाडल्यानंतर दुसरा मुलगा पवन याच्यावरही गोळी झाडली. यामध्ये मुलचंद आणि आकाश यांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. तर, पवन गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी नागपुरात हालवण्यात आले आहे. या हल्ल्यात इतरत्र गोळी गेल्याने पुतण्या कुलदीप शिवचंद द्विवेदी थोडक्यात बचावला आहे. मुलचंद द्विवेदी हे माजी भाजप अध्यक्ष तसेच बल्लारपूर नगर परिषदेचे स्वीकृत सदस्य शिवाचंद द्विवेदी यांचे भाऊ आहेत. संबंधित घटनेमागील कारण अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत.