चंद्रपूर - शेताला लागून असलेल्या नाल्यातील पाणी आणण्यासाठी गेलेल्या बाप-लेकीचा विजेचा धक्कालागून मृत्यू झाला. राजूरा तालुक्यातील सिंधी गावात आज सकाळी ही घटना घडली. स्वप्निल सत्यपाल चहारे (वय 32), शेजिक स्वप्निल चहारे (वय 6) अशी दोघांची नावे आहे.
सिंधी येथील शेतकरी स्वप्निल चहारे हे आपल्या सहा वर्षीय मुलगी शेजिक हिला सोबत घेऊन शेतात गेले. त्यांच्या शेताला लागूनच नाला आहे. या नाल्यावर शेतातील सिंचनासाठी मोटारपंप बसवला आहे. चहारे यांच्या मुलीने नाल्यातील पाण्यात पाय ठेवताच तिला वीजप्रवाहाचा धक्का बसला. तिला वाचवण्यासाठी वडिलांनी धाव घेतली. यात दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महावितरणच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा केला.