चंद्रपूर - वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीवर वर्षानुवर्षे पीक उत्पादन घेणाऱ्या एका पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या चिनोरा येथे घडली. विलास देऊळकर असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
देऊळकर हे प्रगतशील शेतकरी असून आपल्या शेतात ते कापूस-सोयाबीन तुर-चिकू-संत्रा-भाजीपाला यासह हळद आणि इतर विविध पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, सध्या त्याच्यावर विष प्राशन करण्याची वेळ आली आहे. राज्यात वनविभागाने ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ठेवत यावर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आहे. याच अभियानांतर्गत चिनोरा परिसरातील वनविभागाच्या अतिक्रमित जागेवर पिके घेणाऱ्या देऊळकर यांना वनविभागाने ही जागा मोकळी करुन देण्याची मागणी केली. मात्र, या सूचनेला धुडकावत देऊळकर यांनी अतिक्रमित जागेवर कपाशीची पेरणी केली. त्यामुळे आज सकाळी याच अतिक्रमित जागेची मोजणी आणि कुंपण घालण्यासाठी वनविभागाचे पथक त्यांच्या शेतात पोचल्यावर पथक आणि त्यांच्यात मोठा वाद झाला. या वादात देऊळकरांनी वनपथकासमोर किटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकाराने वन कर्मचारी हादरले. उपस्थितांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने शेतकऱ्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. आपल्या पश्चात आपला मोठा परिवार असून, त्यांची गुजराण केवळ याच शेतीच्या तुकड्यावर आहे. हा तुकडा वनविभागाने आपल्या हातात घेतल्यास मला जगण्याचा अधिकार नाही, असे सांगत या शेतकऱ्यांनी आपली व्यथा बोलून दाखवली.
शेतीत उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने देऊळकर यांना शेतीनिष्ठ शेतकरी हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या शेतकऱ्यावर ५० कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाने संकट उभे केले आहे. वनविभागाने वर्षानुवर्षे अतिक्रमित जागेवर शेती करणाऱ्या अशा शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी कोणते उपाय करावे, यावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे.