चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खापरी (भिवकुंड) येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. प्रमोद नारायण मेश्राम (वय-27), असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - लिलाबाई वासनिक हत्या प्रकरणाचा उलगडा; हत्येप्रकरणी गुराख्याला अटक
मेश्राम हे खापरी येथील रहिवासी होते. त्यांच्याकडे 7 एकर शेती असून यावर्षी शेतीसाठी सहकारी संस्थेचे व सावकारी कर्ज घेतले होते. मात्र, नापिकीमुळे व कमी उत्पादन होण्याच्या भीतीने सोसायटीचे व खासगी कर्जाची परतफेड कशी करणार? या चिंतेत ते होते.
शनिवारी नेहमीप्रमाणे प्रमोद शेतावर गेले. त्यांचे आई-वडील देखील शेतावरच होते. मात्र, प्रमोदच्या मनात वेगळेच काही असल्याने तो एकटाच घरी आला. घरी कुणीच नसल्याचे पाहून घरातच त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर घटनेची माहिती शेगाव पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - अकोल्यात चोरीचा सपाटा सुरूच; सव्वाचार लाख रुपयांची रोकड लंपास