चंद्रपूर : जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात शेतकरी आक्रमक झाले आहेत. या भागातील सरकारी कोळसा कंपनी असलेल्या वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या धोपटाळा खुल्या कोळसा खाणीत जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांचा मोबदला व नोकरीचा प्रश्न चिघळला आहे. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रकल्पग्रस्तांनी चक्क मोबाइलच्या टॉवरवरून चढून आंदोलन केले. या प्रकरणी प्रकल्पग्रस्तांवर राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेली अनेक वर्षे धोपटाळा प्रकल्पग्रस्तांनी पाठपुरावा व निवेदने करून आपले प्रश्न व्यवस्थापनापुढे मांडले होते. मात्र, कोळसा खाण व्यवस्थापनाने या मागण्या गांभीर्याने न घेतल्याने आता शेतकरी संतापले आहेत. कोळसा खाणीच्या क्षेत्रीय व्यवस्थापक कार्यालयापुढे असलेल्या मोबाइल टॉवरवर चढून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ३ तासानंतर वेकोलीने ३० दिवसांच्या आत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन थांबविले. तथापि, टॉवरवर चढलेल्या तिन्ही प्रकल्पग्रस्तांवर राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या धोपटाळा खुल्या खाणीत सास्ती, धोपटाळा, कोलगाव, मानोली, भडांगपूर, माथरा या भागांतील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. अधिग्रहण करतेवेळी कंपनीने शेतकऱ्यांना नोकरी आणि जमिनीचा योग्य मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दहा वर्षांचा काळ लोटला तरीपण शेतकऱ्यांचे हात रिकामेच आहेत. जमिनी गेल्या, मोबदला मिळाला नाही. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकाराला कंटाळलेल्या सास्ती येथील विलास घट, मारोती मावलीकर, संजय बेले या प्रकल्पग्रस्तांनी राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाळा वेकोली वसाहतीमधील मोबाइल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
आंदोलनाची माहिती मिळताच घटनास्थळी राजुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर दाखल झाले. सलग तीन तास प्रकल्पग्रस्त टॉवरवर होते. वेकोलीच्या मुख्य क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात झालेल्या चर्चेमध्ये एका महिन्यात शेतकऱ्यांचे करारनामे पूर्ण करण्याचे आश्वासन वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. चर्चेत वेकोलीचे क्षेत्रीय व्यवस्थापक सी पी सिंग, खनन अधिकारी परांजपे, नियोजन अधिकारी पुलीया, पोलीस निरीक्षक कोसुरवार, विजय चन्ने, सूरजभाऊ ठाकरे, बाळूभाऊ जूलमे, किशोर कुळे, राहुल चौहान, दिलीप नरळ, दिनेश वैरागडे, दीपक खनके, मारोती खनके, विनोद बानकर, गजानन कुबडे, बंडावर, पंकज, निखिल, प्रकाश, गणेश पोतराजे, राजू मोहरे, दीपक चंदेल, सोनू बानकर, बालाजी कुबडे, बालाजी पिंपळकर आदी उपस्थित होते. आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन स्थगित केले. मात्र, आंदोलन करणाऱ्या तिन्ही प्रकल्पग्रस्तांवर राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.