चंद्रपूर - शहरातील हल्दीराम कंपनीच्या आऊटलेटमध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली असता हा प्रकार समोर आला. या प्रकरणी अन्न व औषध विभागाने कारवाई केली आहे. या संबंधात विभागाने हल्दीराम कंपनीला नोटीस बजावली आहे.
हल्दीराम हा ब्रँड -
नागपूर येथील हल्दीराम कंपनीची ख्याती आता जगभरात पोहोचली आहे. हल्दीराम म्हणजे दर्जेदार, भेसळमुक्त आणि रुचकर अन्नपदार्थ अशी ओळख सर्वत्र आहे. त्यामुळे याच्या अन्नपदार्थांना प्रचंड मागणी आहे. यामुळेच आता हा एक दर्जेदार ब्रँड झालेला आहे. मात्र, याच हल्दीरामच्या आउटलेटमध्ये एक्सपायरी डेट गेलेले अन्नपदार्थ आढळून आल्याचे समोर आले आहे. नागपूर महामार्गावर हल्दीरामचे प्लॅनेट फूड नावाचे आउटलेट आहे. सोमवारी अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे भेट दिली असता त्यांना अनेक खाद्यपदार्थ हे मुदतबाह्य असल्याचे आढळून आले.
स्वीट चिली सॉस, शेव, पाणीपूरी, बेसन हे पदार्थ मुदतबाह्य असल्याचे दिसून आले. सोबत स्टोअररूममध्ये खाद्य आणि अखाद्य पदार्थ एकाच ठिकाणी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. खाद्यपदार्थ कुठल्या तेलातून किंवा वनस्पतीतुन तयार केली जातात याची कुठलीही माहिती फलक लावून देण्यात आलेली नाही. तसेच जे अन्नपदार्थ आढळते ते नेमके कुठून आणले याचाही कुठलाही तपशील तेथील प्रतिनिधीकडे उपलब्ध नव्हता. तसेच त्याठिकाणी स्वच्छतेचे पालन केले गेले नाही, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली गेली नाही. अशा अनेक आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्याने अन्न व औषध विभागाने अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करीत हल्दीराम कंपनीला नोटीस बजावली आहे. ही कारवाई अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
हेही वाचा - Raj Kundra : मलाही राज कुंद्राने... शिल्पा शेट्टीला अटक का नाही... बॉलिवूड मॉडेलने सांगितली आपबिती!
ब्रँडवर किती विश्वास ठेवायचा?
आज अनेक ब्रँड हे नावाने चालतात. विशेषतः अन्नपदार्थांशी संबंधित ब्रँडची विश्वासार्हता यात अधिक आहे. जेवण किंवा खाण्यासाठी आपण अमुक एक ब्रँडच्या ठिकाणी गेलो तर आपल्या आरोग्याशी हेळसांड होणार नाही, तेथील पदार्थ हे स्वच्छ, सुरक्षित आणि रुचकर असतील, तिथे गेल्यावर स्वच्छता असेल अशी शाश्वती ग्राहकांना असते. मात्र, हल्दीरामच्या आऊटलेटमध्ये ज्या आक्षेपार्ह स्थितीत अन्नपदार्थ आढळून आले त्यामुळे ब्रँडवर आता ग्राहकांनी किती विश्वास ठेवावा हा प्रश्न निर्माण झाला आहे.