चंद्रपूर - तेलंगणा राज्यात अडकलेल्या शेतमजुरांना आज (२ मे) महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वाहनांनी आणून सोडण्यात आले. मात्र, त्यांना घरी परतण्यासाठी राज्य शासन आणि प्रशासनाने कुठलीही सोय केली नाही. त्यामुळे नाईलाजाने हे मजूर पायीच आपल्या गावाकडे निघाले होते. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या मजुरांना घेण्यासाठी वाहने पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे या मजूर वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मात्र, त्यांना आपल्या घरी पाठविण्यासाठी राज्य शासन, प्रशासनाकडे कुठलीही यंत्रणा नव्हती. अशा वेळी हे मजुर मूल, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपीपरी अशा तालुक्यातील आपापल्या गावी पायी निघाले. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करत या ठिकाणी वाहने पाठविली.
सध्या वाहनांचा ओघ मजुरांच्या दिशेने सुरू आहे. यामुळे तब्बल दीड महिन्यांपासून आपल्या घराची ओढ लागलेल्या मजुरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आहे त्या ठिकणी त्या मजूरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.
वाचा 'ईटीव्ही भारत'ने प्रसिद्ध केलेली बातमी - महाराष्ट्र सरकार इकडे लक्ष देईल का? हजार रूपये द्या गावी जा ! तेलंगाणात अडकलेल्या मजूरांची व्यथा