चंद्रपूर - मोदींच्या त्सुनामीसमोर काँग्रेसची धुळदान झाली. यात अनेक दिग्गज नेत्यांना लाजिरवाण्या पराभवाला सामोर जावे लागले. यापैकीच एक होते ते मध्यप्रदेशातील ज्योतिरादित्य सिंधिया. त्यांना पराभूत केले आहे चंद्रपूरचे जावई के. पी. यादव यांनी. या अनपेक्षित विजयामुळे त्यांचे सासरे सेवानिवृत्त प्राध्यापक जांभूळकर यांच्या घरी सध्या जल्लोषाचे वातावरण आहे.
के. पी. यादव यांचे वडील हे काँग्रेसमध्ये होते आणि ते माधवराव सिंधिया यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत के.पी सुद्धा राजकारणात आले. माधवराव गेल्यानंतर त्यांचे सुपुत्र ज्योतिरादित्य सिंधिया यांचे ते निकटवर्तीय झाले. ज्योतिरादित्य सिंधिया खासदार असताना त्यांचे प्रतिनिधी म्हणून के.पी काम करत होते. इतके वर्षे काम करीत असल्याने त्यांनी मुंगवली विधानसभेसाठी मागणी केली. मात्र, २०१८ मध्ये ती आपण देऊ असे ज्योतीरादित्य यांनी सांगितले.
भाजपकडून मिळाली उमेदवारी -
याच दरम्यान येथील काँग्रेसच्या आमदारांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र, ऐनवेळी उमेदवारी दुसऱ्याला देण्यात आली. यामुळे के.पी कमालीचे नाराज झाले. ही नाराजी त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहाण यांनी हेरली आणि त्यांनी के.पी यांच्यावर विश्वास दाखवत थेट भाजपकडून उमेदवारी दिली. मात्र, अवघ्या दोन हजार मतांनी ते पराभूत झाले. एवढे झाले असताना त्यांनी अपेक्षा सोडली होती. अशात ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या विरोधात लढण्याची संधी त्यांना भाजपकडून देण्यात आली. आपण यासाठी सक्षम नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठी याबाबत आग्रही होते. अखेर त्यांनी ही संधी स्वीकारली आणि पुढे इतिहास घडला. के.पी यांनी सिंधिया यांचा तब्बल दीड लाखांनी पराभव केला.
के. पी यांचे चंद्रपूर कनेक्शन -
के.पी यादव यांचे उच्च शिक्षण हे नागपुरात झाले आहे. याच दरम्यान त्यांचा परिचय त्यांच्याच महाविद्यालयात असेलेल्या अनु जांभूळकर यांच्याशी झाला. त्यांनी अनुला लग्नाची मागणी घातली. अनु यांचे वडील प्राध्यापक जांभूळकर यांनी सुद्धा या विवाहाला मान्यता दिली. यानंतर मध्यप्रदेश येथे फेब्रुवारी २००० ला या दोघांचा विवाह पार पडला. तेव्हापासून के.पी दरवर्षी चंद्रपुरात येतात.