चंद्रपूर - बैलगाडीच्या मागेमागे धावणाऱ्या कुत्र्याला वाटतं की, तोच बैलगाडी हाकतोय. ही म्हण ग्रामीण भागात अजूनही रूढ आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात एक कुत्रा असाही आहे की, ज्याने ही म्हण खरी करून दाखवली आहे. पण हा कुत्रा बैलगाडीमागे धावत नाही तर स्वतः बैलगाडी हाकतो, ते ही त्यावर एकटा बसून. विजय थुल नावाच्या शेतकऱ्याचा हा गुणी कुत्रा आहे. या कुत्र्याच्या बैलगाडी चालविण्याची चर्चा आता पंचक्रोशीत होऊ लागली आहे.
कुत्रा हा शेतकऱ्याचा पारंपरिक मित्र समजला जातो. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्याजवळ पाळीव कुत्रा असतोच. घर आणि शेताची राखण तो करतो. आपल्या शेताचे वन्यजीवांपासून रक्षण देखील करतो. मात्र, कुत्रा कधी बैलगाडी हाकत असल्याचे पाहिले आहे का? होय एक कुत्रा यातही पारंगत झाला आहे.
भद्रावती तालुक्यातील गौराळा गावातील शेतकरी विजय थुल यांचा हा कुत्रा आहे. त्याचे नाव 'टिक्या' असे आहे. थुल यांच्या टीक्यात विशेष जीव आहे. त्याला कारणही तसेच आहे. कारण टिक्या हा अत्यंत समजदार आणि गुणी कुत्रा आहे. एवढा की तो स्वतः बैलगाडी हाकतो. यासाठी त्याला आणखी कुणाचीही गरज नाही. थुल यांचे चिरादेवी मार्गावर शेत आहे. घरापासून शेताचे अंतर जवळपास दीड किलोमीटर एवढे आहे. तिथे जाण्यासाठी थुल बैलगाडी जुंपतात. मात्र, याचा ताबा लगेच टिक्या घेतो गाडी हाकायला सुरुवात करतो.
यादरम्यान, अनेक आढवळणे आहेत. मात्र, टिक्या बरोबर बैलगाडी आपल्या शेतात उभी करतो मागून येणाऱ्या आपल्या मालकाची वाट बघत बसतो. टिक्यावर शेतकरी थुल यांचे विशेष प्रेम आहे. त्याची सर्व काळजी ते घेतात. सकाळी उठल्यावर त्याला दूध दिले जाते. त्याला आंघोळ घातली जाते. या गुणी कुत्र्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे.