चंद्रपूर- एखादा व्यक्ती ज्या पदावर बसतो त्या पदाची गरिमा राखली जाणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. ती जबाबदारी आणि सामाजिक भान नसेल तर काय होते याचा आदर्श नमुना चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी प्रस्तुत केला आहे. एकीकडे शहरात जनता कर्फ्यू लावताना नागरिकांना कोरोनाचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन करणारे पावडे यांनी आपल्या वाढदिवशी मात्र कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले आहे.
८ सप्टेंबरला पावडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसात मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंग न ठेवता फोटोसेशन करण्यात आला. आणि हे सर्व फोटो चक्क सोशल मीडियावर टाकण्यात आले. एकीकडे जिल्ह्यात कोरोना भयानकरित्या वाढत असताना पावडे यांनी केलेल्या बेजबाबदारपणामुळे ते टिकेचे धनी ठरले आहेत. त्यांच्या कृत्यावर 'लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि आपण कोरडे पाषाण' अशीच म्हणायची वेळ आली आहे.
गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. केवळ ९०० रुग्णांची संख्या आता ४ हजाराच्या वर गेली आहे. त्यातही चंद्रपूर शहरातील रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांच्या ४५ टक्के एवढी आहे. ही चिंताजनक बाब असून कोरोनाला रोखण्यासाठी १० सप्टेंबर ते १३ सप्टेंबरपर्यंत चंद्रपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार आहे. याबाबत महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाची सोमवारी बैठक पार पडली. यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनी कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जनतेने मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
मात्र, या आवाहनाला उपमहापौर आणि स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी आपल्या वाढदिवशी हरताळ फासला. कुठलाही मास्क न वापरता, सॅनिटाईझेशन न करता तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी जल्लोषात केक कापला, सर्वांशी हस्तांदोलन केले, गळाभेट घेतली. त्याचे फोटोही त्यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी पावडे यांच्या फेसबुक अकाऊंटवर टाकले. जर नेतेच असे वागत असेल तर सामान्य जनतेने हे नियम पाळायचे की नाहीत याची उत्तरे स्वतः पावडे यांनी द्यायला हवी.
पावडे यांच्या कृतीतून जो जनतेत संदेश गेला आहे तो अत्यंत चुकीचा तर आहेच, सोबतच ते कोरोनाचे सर्व नियम प्रामाणिकपणे पाळणाऱ्या सामान्य नागरिकांचे मनोबल खचवणारे आहे. यापूर्वी भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी हाच प्रकार केला होता. त्यात राहुल पावडे यांचाही समावेश होता. आता पावडे यांनी पुन्हा एक पाऊल पुढे टाकत कोरोनाच्या नियमांना हरताळ फासला आहे. जनतेला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांकडून नियमांची पायमल्ली होत असेल तर प्रशासनाने कितीही आवाहन केले तरी कोरोनाची साखळी तुटणार नाही उलट त्याला खतपाणी घालण्याचे कामच पावडे यांच्या कृतीतून दिसून येत आहे.
हेही वाचा- पूरग्रस्तांना काय दिलं, अंबाडीचा भुरका? - अॅड. पारोमिता गोस्वामी