चंद्रपूर Crop Insurance News : राज्य शासनाने यावर्षी एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती. ओरिएंटल इन्शुरन्स या कंपनीकडे (Crop Insurance Company) हे काम देण्यात आले. या वर्षी अवकाळी पावसामुळे शेती आणि पिकाचे मोठे नुकसान झाले. पीक विमा काढणारे 3 लाख 49 हजार शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत. मात्र, त्यांना अद्याप ही रक्कम मिळाली नाही. यासाठी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होते. यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा (Vinay Gowda) यांना निवेदन देण्यात आले.
शिवसैनिकांनी विमा कंपनी कार्यालयाची केली तोडफोड : धरणे आंदोलनानंतर संदीप गिर्हे आणि कार्यकर्त्यांनी ओरिएन्टल विमा कंपनी कार्यालय गाठले. कार्यालयात पोहचताच कर्मचाऱ्यांना जाब विचारत शेतकऱ्यांची विमा रक्कम त्यांच्या खात्यात जमा करा असं म्हटलं. मात्र त्यांना यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी विमा कंपनी कार्यालयाची तोडफोड सुरू केली. येथील साहित्याची नासधूस सुरू केली. जर तात्काळ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही तर विमा कंपनीचे कार्यालय सुरू करू देणार नाही अशी भूमिका जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी यावेळी घेतली.
तांत्रिक बाबीमुळे यादी देता आली नाही : ओरिएन्टल पीक विमा कंपनी, चंद्रपूर व्यवस्थापक तुषार चौधरी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की, आज शिवसैनिकांनी आमच्या कार्यालयात येत शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम किती बाकी आहे असे विचारले. आम्ही त्यांना यादी देणार होतो मात्र तांत्रिक बाबीमुळे यादी देता आली नाही, त्यावर आमचे काही ऐकून न घेता तोडफोड करायला लागले.
हेही वाचा -