चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता नियंत्रणाबाहेर जात असल्याचे चित्र आहे. आज एका वयोवृद्ध रुग्णाला जागा उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठविण्यात आले. हा रुग्ण वन अकादमी येथील कोविड केअर सेंटरच्या आवारात बेवारस अवस्थेत पडून होता. या रुग्णाची ऑक्सिजन पातळी खालावली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाला असल्याने यावर आता समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा - चंद्रपुरात कोरोनाचा विस्फोट; 11 मृत्यूसह 937 कोरोना पॉझिटिव्ह
चंद्रपूर शहरातील समाधी वॉर्डात राहणारे 75 वर्षीय व्यक्ती ही शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळली. शनिवारी या व्यक्तीला वन अकादमी येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. आज त्यांची ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे रेफर करण्यात आले. रुग्णवाहिकेने त्यांना येथे आणण्यात आले. मात्र, येथे रुग्णांना भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाही, असे सांगत त्यांच्यावर उपचार करण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे, रुग्णवाहिकेने रुग्णाला परत कोविड केअर सेंटर येथे आणण्यात आले. काही वेळात रुग्णवाहिका रुग्णाला खाली उतरवून परत निघून गेली. अनेक तास हा रुग्ण येथेच पडून होता.
रुग्णाच्या नातूने या प्रकरणाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला. यावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. अखेर यंत्रणा जागी झाली आणि रुग्णाला चंद्रपूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. मात्र, या व्हिडिओमधून चंद्रपूर जिल्ह्याची स्थिती किती स्फोटक झाली आहे, याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
हेही वाचा - कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथक चंद्रपुरात, आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश