चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनामुळे ग्रस्त असलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मात्र, याची नोंद तेलंगणा राज्यात होणार आहे. कारण मृत पावलेली महिला हे तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद येथून आली होती.
तेलंगाणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या ७५ वर्षीय महिलेचा काल रात्री उशिरा (२४ जुलैला पहाटे २.३० वाजता) मृत्यू झाला. तिला रात्री उशिरा साडेबाराच्या सुमारास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात खाजगी इस्पितळातून दाखल करण्यात आले होते. ही महिला मूळची तेलंगणाची असल्यामुळे तिच्या मृत्यूची नोंद चंद्रपूर येथील कोरोनाबाधित म्हणून होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्फत प्रसिद्धी पत्रकामध्ये ही माहिती दिली आहे. सदर महिला ही तेलंगणा राज्यातून २१ जुलैरोजी चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट केले आहे.तिला श्वसनासंदर्भातील समस्या होती तसेच ती उच्चरक्तदाबाची देखील रुग्ण होती. खाजगी रुग्णालयात असताना या महिलेचा स्वॅब २२ जुलैरोजी घेण्यात आला. या नमुन्यांचा अहवाल २३ जुलैरोजी रात्री ९.३० वाजता पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले. २३ जुलैच्या रात्री १२.५० च्या सुमारास (२४ जुलैला) तिला वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिच्यावर शर्थीचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, २४ जुलैच्या पहाटे २.३० वाजता तिचा मृत्यू झाला. सदर महिला रुग्णाचा मूळ पत्ता तेलंगाणा राज्यातील अदिलाबाद जिल्ह्यातील जैनढ या गावाचा आहे. त्यामुळे या मृत्यूची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित म्हणून होणार नाही असे स्पष्टीकरण वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर यांनी दिले आहे.
दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३३६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून सुदैवाने अद्याप एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही. जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू असून संशयित रुग्णांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावा यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तर, कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये, असे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे. नागरिकांनी नेहमी मास्क वापरावा व शारीरिक अंतर ठेवत काळजी घेण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे