चंद्रपूर - लॉकडाऊनच्या काळात सफाई कामगार जोखीम पत्कारून आपले काम करत आहे. त्यांच्या कामाप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी, आज शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्ड येथील नागरिकांनी पुष्पवृष्टी करून, गळ्यात हार घालून त्यांचा सत्कार केला. नागरिकांच्या या सत्कारामुळे सफाई कर्मचारी भारावले होते.
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकट काळातसुद्धा, सफाई कागार आपल्या जीवाची पर्वा न करता, समाजासाठी काम करत आहेत. ते दररोज सकाळी कचरा गोळा करतात. यामुळे स्वच्छता राखली जात आहे. त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी आज विठ्ठल मंदिर वॉर्ड परिसरात अनोखा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. नेहमीप्रमाणे सफाई कर्मचारी कचरा संकलित करण्यासाठी वॉर्डात आले असता, त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा हार घालून सत्कार करण्यात आला.
दरम्यान, देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे काही राज्यांनी उद्या (१४ एप्रिलला) संपणारा लॉकडाऊन देखील वाढवला आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा ९१५२ वर पोहचला आहे. यामध्ये ७२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यापैकी ८५७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, देशात ३०८ जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या देशातील ७९८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - तोंड न बांधता फिरणाऱ्यांविरोधात चिमूर पोलिसांची गांधीगिरी; हार घालत केली आरती
हेही वाचा - जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मदतीसाठी जिल्हा परिषदेचा पुढाकार, प्रत्येकांच्या खात्यात होणार पाचशे रुपये जमा