चिमूर (चंद्रपूर)- देशात व राज्यात कोविड -१९ बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरीता शासन प्रशासन स्तरावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना विषाणूची लागण झालेला रूग्ण आढळल्यास करावयाची कार्यवाही व या दरम्यान विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचात कसा समन्वय साधावा, यासाठी तालुक्यातील सावरगाव येथे कोविड -१९ नियंत्रण यंत्रणेची रंगीत तालीम घेण्यात आली.
कोरोनामुळे देशात सर्वाधिक बाधितांची व मृतांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शासन, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था व अधिकारी तसेच समाज माध्यमाद्वारे नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघता घरीच राहावे, याकरीता जनजागृती करण्यात येत आहे. बाहेर फिरताना सतत मास्क, साबण, सॅनीटायजर वापरणे तसेच सोशल डिस्टसिंग पाळण्याचे आवाहन केले जात आहे. कुणाला कोरोनाची लागण झाल्यास कोणती कार्यवाही करावी, याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्राप्त निर्देशांप्रमाणे सदर कार्यवाही करताना कोविड -१९ नियंत्रण यंत्रणा कशी समन्वय साधून काम करेल, यासाठी रंगीत तालीम करण्यासाठी चिमूर तालुक्यातील २१९२ लोकसंख्या असलेल्या सावरगावची निवड करण्यात आली.
१ सुपरवायजर व ११ स्वयंसेविकाकडून गावाचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी त्यांना मास्क, सॅनिटायजर व फॉर्म दिले. चिमूर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने संपूर्ण गावात सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी केली. पोलीस विभागाने गावाची नाकेबंदी करून गावभर निगराणी ठेवली. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. तसेच लागण झालेल्या रुग्णास नियंत्रण कक्षात पाठविण्याची रंगीत तालीम घेण्यात आली. या रंगीत तालीमेपूर्वी सर्व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल, तहसीलदार संजय नागटिळक, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकिय अधिक्षक डॉ. गो. वा. भगत, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. दिगांबर मेश्राम तथा खंड विकास अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, उपसरंपच, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.