चंद्रपूर - भाजपच्या महाजनादेश यात्रेवर मात करण्यासाठी काँग्रेसने नाना पटोले यांच्या नेतृत्वात राज्यभरात महापर्दाफाश यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ब्रम्हपुरी येथे येणार होती. मात्र, विरोधी पक्षनेते आणि ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार आणि पटोले यांच्या अंतर्गत वादामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
वडेट्टीवार यांची नुकतीच राज्याच्या निवड समितीत नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीसाठी वडेट्टीवार बाहेर असल्यामुळे ही यात्रा रद्द केली, असे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, वडेट्टीवार आणि पटोले या दोन नेत्यातील वादामुळेच ही यात्रा रद्द झाली,अशी चर्चा चंद्रपूरमधील लोकांमध्ये रंगताना दिसून येत आहे.