चंद्रपूर : एखाद्या लोकप्रतिनिधीचे आकस्मिक निधन झाले की जागा त्याच कुटुंबातील उमेदवाराला दिली जाते, अशी काँग्रेसची परंपरा आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर उमेदवारी बाबत समाजात संभ्रम निर्माण होत असल्याने सुभाष धोटे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी आदींंची उपस्थिती होती.
पाच वर्षांत एकही बैठक नाही : गेल्या पाच वर्षांत जिल्हास्थानी एकही बैठक झाली नसल्याची खंत अनेक तालुकाध्यक्षांनी व्यक्त केली. त्यामुळे आता सर्व तालुक्यांचे दौरे करण्यात येतील. चिंतन शिबिरे घेतली जातील. सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेत चंद्रपूर शहरातील प्रभागात बैठका आयोजित करण्यात येतील. सप्टेंबर महिन्याच्या शेवटी किंवा नंतरच्या पहिल्या आठवड्यात चंद्रपुरात मोठे शिबिर आयोजित केले जाणार आहे. या शिबिराला राष्ट्रीय पदाधिकारी मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
प्रदेश कार्यालयाकडे तक्रार: आमदार प्रतिभा धानोरकर यांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांची उणिव भासू दिली जाणार नाही. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनासुद्धा सोबत घेतले जाईल. चिमूर, बल्लारपूर आणि चंद्रपूर विधानसभेत लक्ष केंद्रित केले जाणार आहे. पक्षातील वातावरण दुषित करणाऱ्याची प्रदेश कार्यालयाकडे तक्रार केली जाणार असल्याचेही धोटे यांनी सांगितले.
मुनगंटीवारांनी संकुचित भावना सोडावी : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे केवळ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातच निधी उपलब्ध करून देत आहेत. हा प्रकार अनेक योजनांसदर्भात सुरू आहे. जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या मुनगंटीवारांनी संकुचित भावना बाळगू नये, असा सल्लाही धोटे यांनी यावेळी दिला आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच : आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहे. याच पक्षाच्या तिकीटावर आगामी निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, शहर जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, दिनेश चोखारे, के. के. सिंग, राकेश रत्नावार, सुभाषसिंग गौर, घनश्याम मुलचंदानी, घनश्याम येनूरकर आदींची उपस्थिती होती.