चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षातील भाजपच्या नगरसेवकांनी मनपातील गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले, असा दावा पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यामुळे भाजप व नगरसेवकांची बदनामी झाली, असा आरोप करीत नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोले यांच्याविरुद्ध चंद्रपुरातील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
'पटोले यांचा दावा निरर्थक'
काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे 8 जूनला चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चंद्रपूर शहरामध्ये असलेल्या बैठकीमध्ये पत्रकारांचा समक्ष बोलत असताना भाजपाच्या काही नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे लेखी निवेदन दिल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता. तर 'यामध्ये नाना पटोले यांनी भाजपा पक्षाच्या कोणत्याही नगरसेवकाचे नाव उघड केलेले नाही, त्यांच्याकडे कोणी लेखी निवेदन दिले आहे व कोणत्या तारखेस दिलेले आहे, हे सुद्धा नमूद केलेले नाही. यामुळे पटोले यांचा दावा निरर्थक आहे', असे म्हणत पटोले यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे'
अशा परिस्थितीमध्ये भाजप पक्षाच्या सर्वच नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्याकडे संशयाच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात झालेली आहे. नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी दाखल तक्रारीत म्हटले आहे की, "मी भारतीय जनता पक्षाचा सदस्य व कार्यकर्ता असून, महानगरपालिका चंद्रपूरमध्ये भानापेठ वॉर्डाचा नगरसेवक आहे. मला या संपुर्ण परिस्थितीचा खुप मानसिक त्रास होत आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची कधीही भेट घेतलेली नाही. तसे कोणतेही निवेदन कधीही दिलेले नाही. तरीसुद्धा माझ्या पक्षातील वरिष्ठांना तसेच पक्षातील इतर कार्यकर्त्यांना व सामान्य जनतेला या बिनबुडाच्या वक्तव्यावरून उत्तरे द्यावी लागत आहेत".
'भाजप पक्षाची व नगरसेवकांची बदनामी करणारा प्रकार'
ते पूढे म्हणाले की, "हा प्रकार जाणीवपूर्वक राजकीय स्वार्थ साध्य करण्याच्या व जनतेची दिशाभूत करण्याच्या वाईट हेतूने, तसेच भाजप पक्षाची व नगरसेवकांची बदनामी करणारा आहे". असा आरोप नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी केला आहे. त्यामुळे नाना पटोलेंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत मनपाचे उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी उपस्थित होते.
हेही वाचा - ...तर काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावे - केंद्रीय मंत्री रामदास आठवले