चंद्रपूर - पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून नागरिकांचा परस्परांची संपर्क येऊ नये, यासाठी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे 144 कलम लागू करण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी(19 मार्च) जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली. यानंतर कुठेही पाच अथवा त्याहून जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फिलीपीन्स वरून आलेल्या दोघांसह आतापर्यंत विदेशातून आलेल्या 45 नागरिकांना देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात अद्याप एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजनां संदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस.एन.मोरे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गहलोत उपस्थित होते. याचसोबत जिल्हा परिषद, महानगरपालिका व विविध विभागाचे विभाग प्रमुखांनी उपस्थिती दर्शवली. सध्या बोगस सॅनिटायझर्स विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन मेडिकल्सवर कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
पुण्यावरून येणाऱ्या कोणत्याही खासगी वाहतूक धारकांनी अधिक पैसे घेतल्यास थेट आरटीओ कार्यालयात प्रवाशांनी तक्रार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिले आहेत. तसेच संबंधित ट्रॅव्हल एजंट्सवर देखील कारवाई करण्याचे निर्देश उपप्रादेशिक अधिकारी शिंदे यांना देण्यात आले आहेत.