चंद्रपूर - साहेब 15 वर्षे झाली गोसेखुर्द प्रकल्पातून आम्हाला एक थेंब पाणी मिळाले नाही, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. यासाठी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील गाडीच्या बाहेर निघून शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण या कामाचा आढावा घेऊ, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
चंद्रपूर जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. घोडाझरी कालवा पाहणी करून निघालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ताफा शेतकरी-प्रकल्पग्रस्तानी थांबविल्याने खळबळ उडाली.
मंत्रालयात बैठक लावण्याचे आश्वासन -
15 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. 31हजार कोटी रु. खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत व्यक्त केली. ठाकरे यांनी गाडीखाली उतरून निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. हीच गोष्ट जाणून घेण्यासाठी मी इथे आलो आहे. 30 वर्षे पूर्ण होऊन हा प्रकल्प का पूर्ण झाला नाही हे जाणून घ्यायचे आहे. मला आपल्याकडूनच या प्रकल्पाबाबत जाणून घ्यायचे आहे. यासाठी मंत्रालयात मी बैठक लावणार आणि त्यात तुम्हाला आमंत्रित करून आपले म्हणणे जाणून घेणार, अशी हमी ठाकरे यांनी दिली. अचानक ताफा थांबवून शेतकऱ्यांनी गा-हाणे मांडल्याने पोलीस-प्रशासनाची कार्यक्रमस्थळी प्रचंड तारांबळ उडाली.