चंद्रपूर - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सविधांचे दुकान सोडता सर्व बाजारपेठा बंद करण्यात आल्या. दरम्यान, नागरिकांच्या गरजा लक्षात घेता जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा व्हावा, याकरिता किराणा व भाजीपाला विक्रीसाठी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र, गर्दी होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यानी २४ तास जीवनावश्यक वस्तू मिळणार अशी घोषणा केली. मात्र, चिमूरमध्ये तब्बल तीन दिवस होऊनही मुख्यमंत्र्याच्या घोषणेचे आदेश आलेच नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
जगाला भयगंडात टाकणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मानवी साखळीमुळे होतो, हे सत्य आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या संचारबंदीने आठवडी बाजार बंद करण्यात आले. सर्व प्रकारचे कार्यक्रम, लग्नसुद्धा रद्द करण्यात आलेत. सुरक्षित अंतराकरिता शासनाने हे पाऊल उचलले. मात्र, जीवनावश्यक वस्तुसाठी औषधे, किराणा आणि भाजीपाला दुकाने ११ ते ५ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, या दिलेल्या वेळात सर्व नागरिक बाहेर निघत असल्याने एकच गर्दी व्हायला लागली.
राज्याची ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने २४ तास सुरू राहतील, अशी घोषणा केली. मात्र, चिमूरमध्ये तब्बल तीन दिवस होऊनही या घोषणेचे आदेश आलेच नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे व्यापाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.