चिमूर (चंद्रपूर) - भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर दुरक्षेत्र केंद्रात हिरापूर शेत शिवारात मोठ्या प्रमाणात हातभट्टी लावून दारू निर्मिती सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे तपास केला असता हिरापूर येथीलच रहिवाशी असलेले चार आरोपी हात भट्टीद्वारे दारू निर्मीती करत असल्याचे दिसले. त्यांना रंगेहात पकडून मोहासडवा, दारू तथा साहित्य असा एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .
चिमूर तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात हातभट्टीद्वारे मोहा दारू निर्मीती, वाहतूक व विक्री सुरू आहे. भिसी पोलीस स्टेशनच्या शंकरपूर पोलीस दुरक्षेत्र केंद्राद्वारे या वर अंकुश लावण्या करता धडक मोहीम सुरू आहे. या केंद्राला गोपनीय सुत्राकडून मिळालेल्या माहीती प्रमाणे हिरापूर येथील प्रभाकर सिडाम याचे शेतशिवारात धाड टाकली. यावेळी प्रशांत प्रभाकर सिडाम, अमानत मधुकर सालवटकर, प्रशांत दाजीबा नगराळे व गजु चंद्रभान कननाके सर्व राहणार हिरापूर हे नाल्याजवळ दोन गावठी हातभट्टी लावून, मोहसडवा पासून गावठी दारू काढताना रंगेहात मिळाले.
या चारही आरोपींचे तांब्यातून २३० किलो मोहसडवा अंदाजे किंमत ९२,०००₹, ६० लिटर गावठी हात भट्टी दारू अंदाजे ३६,००० रुपयाची व ईतर साहित्य ५०० रुपये असा एकूण १ लाख २८ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी विरुध्द कलम-६५फ.ब.क, ८३ मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कार्यवाही शंकरपूर पोलीस दुरक्षेत्र केंद्राचे प्रभारी पोलीस उप निरीक्षक विनोद जांभळे व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी पार पाडली .