चंद्रपूर - चिमूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव (बेगडे) जंगल परिसरात मोहा दारू हातभट्टीचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याची गुप्त माहिती चिमूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज (शुक्रवारी) सकाळी ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह जंगल परिसरात सर्च आपरेशन राबवून 8 लाख 22 हजार रुपये किंमतीची मोहा दारू आणि सडवा नष्ट केला.
कोरोनाच्या संसर्गाने पूर्ण देश हादरला असून या पार्श्वभूमीवर राज्यात दारू दुकाने बंद करण्यात आली होती. त्यामुळे तळीरामांनी आपला दारू हातभट्टीकडे वळवला. त्यामुळे मोहा हातभट्टीची संख्या तालुक्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे मोहा दारूवर आळा घालण्यासाठी पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. चिमूर नगर परिषद क्षेत्रातील सोनेगाव (बेगडे) जंगल परिसरात हातभट्टी वर मोहा दारू असल्याची माहिती चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मिळाल्याने त्यांनी पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांना सोबत घेऊन सोनेगाव बेगडेचा जंगल परिसर पूर्णपणे पिंजून काढून काढला. यावेळी त्यांना नाल्याचे भागात 2 ठिकाणी 8 लाख 22 हजार रुपये किंमतीची हातभट्टी मोहा दारूचा साठा मिळून आला.
पोलिसांकडून यावेळी 2 आरोपींवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्यासह पोलीस हवालदार विलास सोनूले, विलास निमगडे, नापोशी किशोर बोढे, सचिन गजभिये , विनायक सरकुंडे, सतीश झिलपे, भरत गोडवे, शैलेश मडावी, शंकर बोरसरे , शरीफ शेख , होमगार्ड राजू कामडी, प्रमोद बनकर, राजू चौधरी, रवी गायकवाड, अतुल नागपुरे, कवडू दिघोरे यांनी पार पाडली.