चंद्रपूर - चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या माणूसमारी वन परिसरात हातभट्टी दारू काढली जात असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी सकाळी १०च्या दरम्यान पोहोचले असता मोठ्या प्रमाणात दारूनिर्मिती होत असल्याचे आढळले. पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपींना अटक केली.
दुसऱ्या एका कारवाईत मोहादारूची वाहतूक करणाऱ्या ४ आरोपींसह १ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात देशी विदेशी अवैध दारूची वाहतूक व विक्री तालुक्यात होत होती. मात्र लॉकडाऊन घोषित झाल्याने सर्व प्रकारच्या दारूची दुकाने बंद झालीत. ज्यामुळे देशी विदेशी दारूची वाहतूक व विक्री करणारे दारूतस्कर हातभट्टीच्या दारूनिर्मिती, वाहतूक व विक्रीच्या कामाला लागले. तालुक्यामध्ये वस्तीलगत जंगल क्षेत्र असल्याने येथे हातभट्टी लावून दारू निर्मिती होत आहे.
अशाच प्रकारे चिमूर शहरालगत असलेल्या माणूसमारी या जंगल क्षेत्रात हातभट्टी लावून मोहफुलांची दारू निर्मिती होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर पोलीस विभागाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलीस निरीक्षक चिमूर स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावर हातभट्टीद्वारे दारू निर्मिती होत असल्याचे दिसले. पोलीस पथकांनी मोहादारू, सडवा, हातभट्टी साहित्य व एक मोटारसायकल मिळून ३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल मिळाला. मोहादारू काढणारे सुभाष महादेव वाघमारे, सुनील अंबादास उईके, गणेश सखाराम नान्हे, गणेश शंकर खडसे यांना अटक करण्यात आली.
दुसऱ्या कारवाईत मोहादारूची तीन मोटारसायकलवर वाहतूक करताना मोटेगाव येथील प्रकाश सोनबा खोब्रागडे, अविनाश उर्फ प्रदीप अशोक शेंडे, राजेश गुप्तराज रामटेके व चंद्रभान भैयाजी रामटेके यांना मोहादारू व तीन मोटारसायकल असा १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी प्रमोद गुट्टे, दगडु सरवदे यांनी पार पाडली.