चंद्रपूर - शहरात अनेक ठिकाणी गर्दी उसळताना दिसते आहे. काही लोक कारण नसतानाही बाहेर पडत आहेत. ज्या वस्तू स्वतःच्या परिसरात उपलब्ध आहेत त्या वस्तू घेण्याच्या नावाने इतरत्र फेरफटका मारत आहेत. यावर आता चंद्रपूर महानगरपालिकेने एक अभिनव तोडगा काढला आहे. यासाठी आत शहरातील प्रत्येक घरात पास वितरीत करण्यात येत असून कुटुंबातील एकाच सदस्याला जीवनावश्यक वस्तूंसाठी आठवड्यातून एकदाच घराबाहेर पडता येणार आहे. यामुळे गर्दी टाळण्यास मोठी मदत होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही. ही स्थिती कायम ठेवण्यासाठी लोकडाऊनचे कडक पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठीचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली. त्यानुसार आयुक्त राजेश मोहिते यांच्या नेतृत्वात चंद्रपूर महानगरपालिकेने पास वितरणाचा एक अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ज्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात होणार आहे. त्यानुसार जीवनावश्यक वस्तू आणि अत्यावश्यक कामासाठी घरातील एकाच सदस्य बाहेर पडण्याची मुभा आहे.
या 'चंद्रपूर पॅटर्न' मध्ये शहरातील प्रत्येक घरात एका विशिष्ट पासचे वितरण केले जात आहे. त्यात वॉर्डचे नाव, बाहेर पडण्याचा दिवस (उदा. सोमवार, मंगळवार), बाहेर पडणाऱ्या दोन व्यक्तींची नावे याचा उल्लेख असतो. एक व्यक्ती काही कारणास्तव बाहेर पडू न शकल्यास दुसऱ्या सदस्याचा विकल्प म्हणून दोन नावे. ही माहिती भरून झाली की पास वापरण्यास तयार होतो. सोमवार ते शनिवार अशा प्रकारचे सहा पास तयार करण्यात आले आहेत.
शहरात एकूण 17 प्रभाग आहेत. ज्यामध्ये 85 हजार घरांचा समावेश आहे. आशा वर्करच्या माध्यमातून हे पासेस घरोघरी जाऊन वितरित केले जात आहेत. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. यानंतर प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला आठवड्यातून एकदाच बाहेर पडता येणार आहे. त्यातही आपल्या प्रभागातील दुकाने किंवा बाजारातूनच त्याला वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. असा व्यक्ती दुसऱ्या प्रभागात दिसला तर त्याच्यावर कारवाई होईल. उदाहरणार्थ सोमवारी पांढऱ्या रंगाचे कार्ड आहे. म्हणजे या दिवशी ज्यांच्याकडे पांढरे कार्ड आहे असेच लोक घराबाहेर पडू शकणार आहेत. त्यामुळं जीवनावश्यक वस्तूसाठी बाहेर गर्दी होणार नाही. प्रत्येक वॉर्डात काही मोजकेच लोक बाहेर दिसतील. यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळता येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर 'चंद्रपूर पॅटर्न' संपूर्ण देशासाठी एक आदर्श उपक्रम ठरणार आहे.