चंद्रपूर- कोरोना काळात रोजगार गेल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली. त्यामुळे, जून महिन्यापर्यंत थकबाकीमुळे महावितरणला मोठा तोटा सहन करावा लागला. मात्र, यानंतर महावितरणने याबाबत व्यापक मोहीम राबवली. जनजागृती केली. त्याचा परिणाम दिसायला लागला असून ग्राहकांनी वीजबिल भरायला सुरुवात केली आहे. तरीही दर महिन्यात थकबाकी वाढतच आहे. अशात या चिंतेवर फुंकर घालण्याचे काम महावितरणचे उच्चदाब वर्गात मोडणारे औद्योगिक ग्राहक करीत आहेत. त्यांचा भरणा नियमित होत असल्याने ऑक्टोबर महिन्यापर्यंत एकूण ७७.२६ टक्के वीजबिल वसुली झाली आहे. यामुळे महावितरणला मोठा दिलासा मिळाला आहे.
महावितरणच्या माध्यमातून सर्वांना वीज पुरवठा केला जातो. कमी दाबाचे घरगुती ग्राहक, किरकोळ दुकानदार, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पथदिवे, तसेच उद्योगांसाठी उच्च दाबाचे ग्राहक असे वर्गीकरण केले जाते. चंद्रपूर जिल्ह्याच्या महावितरण परिमंडळाच्या माध्यमातून चंद्रपूर आणि गडचिरोली अशा दोन्ही जिल्ह्यात वीजपुरवठा केला जातो. या विभागामध्ये कमी दाबाचे एकूण ७ लक्ष ८७ हजार ५७९ इतके ग्राहक आहेत. यामध्ये चंद्रपूर सर्कलचे ४ लाख ३८ हजार ३४२ आणि गडचिरोलीचे ३ लाख ४९ हजार २३७ ग्राहकांचा समावेश आहे. तर, उच्च दाबाची वीज वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या २९६ इतकी आहे. यात चंद्रपूर सर्कल २१३ आणि गडचिरोली सर्कलच्या ८३ ग्राहकांचा समावेश आहे.
चंद्रपूर सर्कलमध्ये बल्लारपूर, चंद्रपूर आणि वरोरा अशा तीन विभागांचा समावेश आहे. तर, गडचिरोली सर्कलमध्ये आलापल्ली, ब्रम्हपुरी आणि गडचिरोली विभागाचा समावेश होतो. १ मार्च ते २६ ऑक्टोबर या दरम्यान लघू दाबाच्या वीज ग्राहकांची थकबाकी ही ४४९ कोटी इतकी होती, तर त्याचा भरणा २७९ कोटी म्हणजे ६२.१४ टक्के होऊ शकला. यामध्ये बल्लारपूर विभाग ५५.६२ टक्के, चंद्रपूर विभाग ६४.४८ टक्के, वरोरा विभाग ६२.८७ टक्के इतका वीजभरणा होऊ शकला. तर, आलापल्ली विभाग ५२.६० टक्के, ब्रम्हपुरी विभाग ५८.८१ टक्के आणि गडचिरोली विभागातून ६४.४५ टक्के इतका भरणा करण्यात आला.
दर महिण्यामागे घरगुती थकीत बिलामध्ये भर पडत आहे
एकूण स्थिती जरी पूर्ववत होत असली, तरी दर महिण्यामागे घरगुती थकीत बिलांमध्ये भर पडत आहे. मात्र, महावितरणच्या उच्च दाबाच्या वीज ग्राहकांमुळे हे संतुलन राखण्यास मोठी मदत मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने उद्योगांचा समावेश आहे. १ मार्च ते २६ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार तब्बल ८९.५८ टक्के वीजबिलाचा भरणा करण्यात आला आहे. ३४३ कोटींच्या थकीत बिलापैकी ३०८ कोटींचा भरणा करण्यात आला आहे.
सातत्याच्या प्रयत्नाने विदर्भात चंद्रपूर महावितरण विभागाची कामगिरी उल्लेखनीय
महावितरणसाठी हे चित्र आशादायी आहे. यामध्ये बल्लारपूर विभाग ९४.६८ टक्के, चंद्रपूर विभाग ८७.३४ टक्के, वरोरा विभाग ९६.७७ टक्के, आलापल्ली विभाग ८५.४९ टक्के, ब्रम्हपुरी विभाग ८९.९४ टक्के, गडचिरोली विभाग ८५.१३ टक्के इतक्या वसुलीचा समावेश आहे. विभागातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी थकीत बिलाचा भरणा लवकर व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. सातत्याच्या प्रयत्नाने विदर्भात चंद्रपूर महावितरण विभागाची कामगिरी उल्लेखनीय आहे, आणि यासाठी आणखी प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा- मुस्लीम आरक्षणासाठी राष्ट्रपतींची शिष्टमंडळासह घेणार भेट; खासदार धानोरकरांचे आश्वासन