चंद्रपूर - प्रदुषित शहर म्हणून चंद्रपूर शहराची राज्यात दुसऱ्या क्रमांकावर नोंद करण्यात आली आहे. मागच्या 151 दिवसांत तब्बल 98 दिवस चंद्रपूर शहराचे प्रदूषणात वाढ नोंदविण्यात आली आहे. २०२०-२०२१ दरम्यान टाळेबंदीनंतर चंद्रपूर शहरातील वायू प्रदूषणात पुन्हा वाढ होऊ लागली असल्याचे प्रदूषण मंडळांच्या जानेवारी ते मे २०२२ या ५ महिन्याच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. जानेवारी ते मे या १५१ दिवसांत चंद्रपूर शहरात ४७ दिवस चांगले तर ९८ दिवस प्रदूषित होते. सोबत शहरालगतच्या औद्योगिक क्षेत्रात उन्हाळ्यातील १५१ दिवसांत चांगले दिवस केवळ ३३ तर तब्बल ११५ दिवस प्रदूषित होते. चंद्रपूर शहरातील प्रदूषणामुळे रोग आणि मृत्यूचे वाढते प्रमाण पाहता हे प्रदूषण कमी करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक आणि ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील चंद्रपूर, ताडाळी, घुग्गुस आणि बल्लारपूर हे चार ओद्योगिक क्षेत्र हे गेल्या १२ वर्षांपासून सतत अतिप्रदूषित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. अनेक कृती आराखडे आखले गेले तरी प्रदुषणात संथगतीने सुधारणा होत आहे. आजही चंद्रपूरचा सेपी स्कोर (CEPI) हा ७४.४१ असून तो महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील उद्योग हे त्यांचे प्रदूषण मापन करतात. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण मंडळ स्वतंत्रपणे प्रदूषण मापन करतात. हवेची गुणवत्ता तपासताना कमीतकमी तीन आणि जास्तीत जास्त सहा प्रदूषकांचा समावेश होतो. या सर्व मानकात चंद्रपूर शहराचे प्रदूषण चिंताजनकरित्या वाढलेले असल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर शहराचे मागील पाच महिन्याचे प्रदूषण - शहरातील नोंद झालेल्या प्रदूषण मापन केंद्राच्या २०२२ च्या आकडेवारीनुसार जानेवारी महिन्यात चांगले दिवस १३ असून प्रदूषित दिवस १८ ( त्यात अति प्रदूषित २ दिवस ) होते. फेब्रुवारी महिन्यात चांगले दिवस १३ तर प्रदूषित दिवस १५ होते. मार्च महिन्यात चांगले दिवस ६ तर प्रदूषित तब्बल २५ दिवस होते. एप्रिल महिन्यात ८ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित होते. मे महिन्यात ७ दिवस चांगले तर २३ दिवस प्रदूषित होते. मागील ५ महिन्यातील एकूण १५१ दिवसांत ४७ दिवस चांगले आरोग्यदायी तर ९८ दिवस प्रदूषीत होते.
औद्योगीक क्षेत्र खुटाळा येथील प्रदूषणाची नोंदणी - जानेवारी महिन्यात या क्षेत्रात १० दिवस चांगले तर २१ दिवस प्रदूषित (अतिप्रदूषित ३ दिवस) होते. फेब्रुवारी महिन्यात २८ पैकी तब्बल २७ दिवस हे प्रदूषित होते. मार्च महिन्यात ३१ पैकी ३० दिवस प्रदूषित. एप्रिल महिन्यात १३ दिवस चांगले तर १७ दिवस प्रदूषित (अतिप्रदूषित ३ दिवस) मे महिन्यात १० दिवस चांगले तर २० दिवस प्रदूषित होते. खुटाळा परिसरातील मागील ५ महिन्यातील एकूण १५१ दिवसात ३३ दिवस चांगले तर ११३ दिवस प्रदूषित होते. ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे.
हे आहेत उपाय - चंद्रपूर शहरात वाहनांची वाढती संख्या, रस्त्यावरची धूळ, कचऱ्याची जाळपोळ, कोळशाची जाळपोळ, असुरक्षित बांधकामे, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचा धूर ही प्रदूषणाची महत्वाची कारणे आहेत. यासाठी नागरिकांनी पुढाकार घेवून प्रयत्न केले तर प्रदूषण कमी होऊ शकते. यासाठी बॅटरीवर चालणारी वाहने आणि सायकलचा वापर करणे, रस्त्याची सफाई नियमित करणे, शहरात कचरा आणि कोळसा जाळण्यावर बंदी आणि कारवाई करणे, महाऔष्णिक वीज केंद्राच्या जुन्या सर्व संचात सुधारणा केल्यास प्रदूषण कमी होऊ शकेल, असे प्रा. चोपणे यांनी सुचविले आहे.
हेही वाचा - Anchaleshwar Temple : चंद्रपुरात चारशे वर्षांपूर्वीच लागला ईमोजीचा शोध; आश्चर्य वाटले ना... तर हे एकदा वाचाच