चंद्रपूर - मिर्ची तोडण्यासाठी तेलंगाणा राज्यात गेलेले चंद्रपूर जिल्ह्यातील शेतमजूर हजारोंच्या संख्येने तेथे अडकून पडले आहेत. ते आपल्या राज्यात परतण्यासाठी राज्य शासनाकडे टाहो फोडत आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणामुळे त्यांना तिथेच राहावे लागेल. त्यांच्या सुरक्षित उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी तेलंगाणा सरकार बघणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
सध्या कोरोनाचे संकट सर्व देशभर पसरले आहे. यावर मात करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. संपूर्ण राज्याच्या सीमा सील करण्यात आल्याने दुसऱ्या राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना मोठ्या संकटाला समोर जावे लागत आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, सावली, ब्रम्हपुरी, गोंडपीपरी या तालुक्यांतील शेतमजूर हजारोंच्या संख्येने तेलंगाणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले आहेत. मात्र, याच दरम्यान लॉकडाउन झाल्याने ते तिथेच अडकले. अनेकांना शेतातच राहावं लागत आहे. त्यांना गावात येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
अडकलेल्या अनेकांनी आपच्या पारोमिता गोस्वामी यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या प्रयत्नाने अनेकांना तेथील अधिकाऱ्यांनी या शेतमजुरांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली. गोस्वामी यांनी मजुरांची सर्व परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली. तसेच त्यांची राज्यात येण्यासाठीची व्यवस्था करण्यात यावी, असे आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केले.
यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या मजुरांच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत तेलंगाणाचे मुख्यमंत्री राव याच्याशी चर्चा केली. त्यात सुरक्षेच्या कारणावरून कुणालाही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेणे शक्य नसल्याचे समोर आले. त्या मजुरांची सर्व जबाबदारी ही तेलंगाणा राज्य घेईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.