चंद्रपूर - विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या 21 ऑक्टोबरला राज्यभर मतदान होणार आहे. चंद्रपूरमध्ये सहा विधानसभा क्षेत्रासाठी 18 लाख 72 हजार नागरिक मतदान करणार आहेत.
जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. एकूण 18 लाख 72 हजार 787 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 9 लाख 11 हजार 938 महिला मतदार तर 9 लाख 60 हजार 827 पुरुष मतदार आहेत. 27 सप्टेंबर पर्यंत मतदार नोंदणी सुरू राहणार आहे. जिल्ह्यात सध्या 2098 मतदान केंद्र आहेत. यातील 28 मतदान केंद्रे सहाय्यक मतदान केंद्र म्हणून निर्माण केले गेले आहे. प्रत्येक मतदार संघात दोन मतदान केंद्र महिला म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मतदान यंत्रांची सुरक्षा वाढवण्यात आली असून यंत्राच्या वाहतुकीदरम्यान जीपीएस ट्रॅकिंग वापरण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 4 हजार पोलिस कर्मचारी तसेच केंद्रीय सुरक्षा दलाचे पोलीस तैनात करण्यात येतील, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.
हेही वाचा - नागपूर विभाग : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ?
आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे. तसेच निवडणूक प्रक्रियेतील मतदारांवर पैशाचा प्रभाव पडू नये याकरता भरारी पथक, स्थायी निरीक्षण पथक, व्हिडिओ निरीक्षण पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान केंद्र शोधण्यास अडचण येऊ नये, यासाठी पाच दिवस अगोदर छायाचित्र असलेली प्रत देण्यात येणार आहे. १९५० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मतदारांना मतदानकेंद्र शोधण्यास सहकार्य करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.