चंद्रपूर - जिल्ह्यात मागील सात महिन्यात तब्बल 5478 कुत्र्यांनी लोकांचा चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर 757 जणांना सर्पदंश झाला, यात एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न समोर आला आहे.
अशी आहे कुत्रा चावल्याची आकडेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे असे कुत्रे चावा घेण्याची शक्यता अधिक असते. त्यानुसार शहरी भागात कुत्रा चावण्याचे प्रमाण अधिक आहे. यात सर्वाधिक घटना ह्या चंद्रपूर शहरातील परिसरात घडल्या आहेत. मागील आठ महिन्यात तब्बल 1331 जणांना कुत्रे चावले. तर बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात 696 जणांवर कुत्रा चावल्याच्या घटना नमूद आहेत. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात 640 रुग्णांना याच कारणास्तव दाखल करावे लागले. याचप्रमाणे भद्रावती रुग्णालयात 397, ब्रम्हपुरी 230, चिमूर 183, गोंडपीपरी 207, गडचांदूर 481, कोरपना 161, मूल 306, नागभीड 198, राजुरा 408, सावली 109, सिंदेवाही 129 अशाप्रकारे तब्बल 5478 जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद आहे. सुदैवाने यापैकी एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
चंद्रपुरात सर्पदंशाने चार जणांचा मृत्यू - जानेवारी ते ऑगस्ट या सात महिन्यांच्या कालावधी 757 जणांना चावा घेतल्याची नोंद आहे. यात चार जणांना आपला जीव गमवावा लागला. ग्रामीण भागात शेतीची कामे करताना विषारी बिनविषारी सापांनी चावा घेतल्याचे प्रमाण अधिक असते. आश्चर्याची बाब म्हणजे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात सर्पदंशाचे तब्बल 243 रुग्ण दाखल केल्याची नोंद आहे. त्यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर सर्वाधिक सर्पदंशाचे रुग्ण गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात 64 रुग्णांना सर्पदंश झाला. याचप्रमाणे बल्लारपूर 32, भद्रावती 28, ब्रम्हपुरी 34, चिमूर 55 ( 2 मृत्यू) गोंडपीपरी 46, कोरपना 20, मूल 16, नागभीड 63, राजुरा 35, सावली 28, सिंदेवाही 21 आणि वरोरा उपजिल्हा रुग्णालयात 68 रुग्णांची नोंद आहे.
चंद्रपुरात श्वानांपेक्षा सर्पदंशाच्या घटना अधिक - चंद्रपूर तालुक्यात येणारा परिसर हा बहुदा चंद्रपूर शहराला लागून असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक आणि इतर यंत्रणाची स्थिती ही जिल्ह्याच्या इतर ठिकाणच्या तुलनेत बरी आहे. त्यामुळे शहरी भागात सर्पदंश प्रमाणाच्या घटना कमी असाव्या अशी शक्यता असते. मात्र वास्तविक स्थिती यापेक्षा वेगळी आहे. चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या प्रकरणांपेक्षा सर्पदंशाची बाधा होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे.