चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील दिपाली रविचंद्र मासीरकर ही २००८ च्या नागालँड बॅचची आयपीएस अधिकारी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणूकीकरिता संचालक म्हणून दिल्ली येथे त्यांची नेमणूक केली होती. त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीचे निरीक्षक म्हणून आपले कार्य बजावलं आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. आज ( 18 जुलै ) देशात राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली आहे. त्याचा निकाल 21 जुलै रोजी लागणार ( Deepali Masirkar is presidential election observer ) आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएकडून द्रौपती मुर्मू तर युपीएकडून यशवंत सिन्हांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यासाठी आज मतदान पार पडलं. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पाच वर्षासाठी भारत निवडणूक आयोगात संचालक म्हणून दिपाली मासिरकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. मराठमोळ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला राष्ट्रपती निवडणुकीत आपले कर्तव्य बजावण्याची संधी मिळालेली आहे. ही बाब अभिमानास्पद आहे. दीपाली मासिरकर यांनी मुंबई येथे सहाय्यक महानिरीक्षक या पदावर कार्य केलं आहे.
दरम्यान, दीपाली मासिरक यांनी नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस उपायुक्तपदी काम केलं. तसेच, भारत निर्वाचन आयोगाच्या संचालक पदी, तर नागालँडमधील कोहीना येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्य केलं आहे. भारत निवडणूक आयोगाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दीपाली मासिरकर यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा - Monsoon Session Begin Today : देशासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा - पंतप्रधान; संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू