चंद्रपूर - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी म्हणजेच, बालदिनानिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी वडगाव प्रभागातील लहान मुलांसाठी एका अभिनव उपक्रमाचे आयोजन केले. लहान मुलांना कलाकुसरचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम आपल्या प्रभागांमध्ये राबविण्याची सुरुवात देशमुख यांनी केली आहे.
हेही वाचा - 13 नोव्हेंबरला कोळसा पाईप कन्व्हेयरचे लोकार्पण; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मागील दीड वर्षांपासून कोरोना आपत्तीमुळे मुलांच्या शाळा बंद होत्या. ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर करणे भाग पडले, यामुळे अनेक मुलांना मोबाईलचे व्यसन जडले. लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर सुरू केल्याने पालक सुद्धा चिंतेत आहेत. मात्र, पालकांनी वारंवार सांगूनही मुलांच्या हातातून मोबाईल सुटत नाही, अशी परिस्थिती घरोघरी दिसते. अशाप्रकारे जवळपास प्रत्येक घरी मोबाईलमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावर उपाय म्हणून लहान मुलांना कलाकुसरचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम आपल्या प्रभागांमध्ये राबविण्याची सुरुवात देशमुख यांनी केली. वडगाव जुनी वस्ती येथील हनुमान मंदिरासमोरील प्रांगणामध्ये मुलांना प्रशिक्षण देऊन या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली.
कला शिक्षिका प्रिती बैरम - पोटदुखे यांनी यावेळी मुलांना घरगुती वापराच्या वस्तूंपासून विविध सुंदर टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. घरगुती वापराच्या दिव्यापासून अगरबत्तीचे स्टँड, प्लास्टिकच्या बॉटलपासून पेन स्टँड इत्यादी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले. जनविकास सेनेच्या मनिषा बोबडे, इमदाद शेख, किशोर महाजन, आकाश लोडे, गीतेश शेंडे, नेत्रा इगुलवार, रमा देशमुख इत्यादींनी लहान मुलांना विविध वस्तू तयार करण्यासाठी सहकार्य केले.
हेही वाचा - VIDEO : एस टी कर्मचाऱ्यांचे मुंडन आंदोलन