चंद्रपूर : जिल्ह्यात मागील 24 तासात (शनिवार) 62 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 126 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून, एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 25 हजार 518 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ही 23 हजार 972 झाली आहे. सध्या 1,138 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत दोन लाख 47 हजार 204 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यांपैकी दोन लाख 17 हजार 259 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज कोरोनामुळे मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या सिस्टर कॉलनी येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 408 कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 369, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 126 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 65, चंद्रपूर तालुका 16, बल्लारपूर चार, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी सात, सिंदेवाही आठ, राजुरा दोन, चिमूर एक, वरोरा 10, कोरपना एक, जिवती दोन व इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यांमध्ये आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करुन सुरक्षित रहावे; असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.