चंद्रपूर - राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होणार असे वाटले असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. सकाळी ७ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या अनपेक्षित घडामोडींमुळे राजकीय 'भूकंप' झाला. या धक्क्यातून शिवसेना, राष्ट्रवादी सावरत आहे. यांच्यासोबत कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील एक जण या धक्क्यातून सावरण्याची धडपड करत आहे. यासाठी त्याला एका दिवसाची सुट्टी हवी असून त्याने यासंदर्भात त्याने तसा अर्जही केला आहे.

जहीर सय्यद हे पेशाने शिक्षक आहेत. ते सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात शिकवतात. त्यांना राज्यात आलेल्या राजकीय भूकंपाचा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी सय्यद यांना सुट्टी हवी आहे. सय्यद यांनी यासाठी थेट प्राचार्यांना अर्ज केला असून मला एका दिवसाची सुट्टी हवी असल्याची मागणी केली आहे.
काय आहे अर्जात -
आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेल्या भूकंपामुळे मी पार हललेला आहे. त्यामुळे या परिस्थितीतून सावरण्याकरता मला एक दिवसाची सुट्टी हवी आहे. तरी आपण मला एका दिवसाची सुट्टी मंजूर कराल, असा मजकूर सय्यद यांनी अर्जात लिहला आहे.
सय्यद यांचा अर्ज प्राचार्यांनी नामंजूर केला. तेव्हा सय्यद यांनी हा अर्ज व्हॉट्स अॅपवर टाकला. महत्वाचे म्हणजे सय्यद यांचा अर्ज सद्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे वरिष्ठांनी सय्यद यांची चांगलीच कानउघाडणी केली.