चंद्रपूर - मदत देतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणे भाजप नेत्याला चांगलेच महागात पडले. याप्रकरणी भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजभूषण पाझारे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या गरीब, गरजूंना मदत करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याला ऊत आला आहे. यावर अनेक ठिकाणी आक्षेप घेतला जात आहे. यातून मदत घेणाऱ्याचा स्वाभिमान दुखावला जातो. अनेक ठिकाणी असे फोटो टाकणाऱ्यावर कारवाई देखील झाली आहे. आता याच कारवाईला भाजपचे नेते ब्रिजभूषण पाझारे यांना समोर जावे लागत आहे.
भाजपतर्फे गरजू लोकांनां धान्याची किट वितरित केली जात आहे. काल 14 एप्रिलला पाझारे यांनी बाबूपेठ परिसरात किटचे वितरण केले. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर टाकले. ही गोष्ट गरजूंना लक्षात येताच त्यांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. याविरोधात त्यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पाझारे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.