चंद्रपूर - आपला धर्म वाचवण्यासाठी पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान या देशांतील मुस्लिमेतर लोक भारतात येतात. मात्र, कोणताही मुस्लीम स्वत:चा धर्म वाचवण्यासाठी भारतात येत नसून, तो येथील रोजगार हिसकवण्यासाठी येत असल्याचे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी केले आहे. यामुळेच बाहेरील देशातून आलेल्या हिंदू, शीख, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन लोकांना देशात संरक्षण दिले जाईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.
देशात अवैधरित्या राहणाऱ्या नागरिकांची चाचपणी केली जाणार असून, यामध्ये एकही घुसखोराला देशात राहू दिले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन शरणार्थ्यांना देशातून बाहेर काढले जाणार नाही, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल येथील एका सभेत केले होते. यावर भाजप प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
शेजारील देशातून मुस्लीम वगळता इतर धर्मीय लोक आपले धर्म वाचवण्यासाठी आले असल्याचे ते म्हणाले. जो आपला धर्म वाचवण्यासाठी येतो त्याचे देशात स्वागतच आहे. मात्र, या देशांमधील मुस्लीम भारतात स्वतःच्या धर्माला वाचवण्यासाठी येत नसून, तो येथे रोजगार हिसकावण्यासाठी येत असल्याची टीका त्यांनी केली. यामुळे त्यांना देशात संरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रवक्त्यांनी केले आहे.