चंद्रपूर - भाजपासोबत आलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे वारंवार सांगत आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) हे कुणाची खासगी मालमत्ता नाही. जो हिंदुत्वाला मानतो आणि हाती भगवा घेतो, अशा सर्वांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव आणि फोटो लावण्याचा अधिकार आहे, अशी टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar BJP leader ) यांनी केली आहे. जर हाच अर्थ घ्यायचा असेल तर शिवाजी महाराजांचा फोटो हा फक्त त्यांच्या वंशजांनी लावावा, शाहू महाराजांचा फोटो फक्त त्यांच्या वंशजांनी लावावा का? असा सवालही मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.
'ईडीच्या दबावाचा काय संबंध?' : शिंदे गटातील नेते हे ईडीच्या कारवाईच्या दबावामुळे भाजपासोबत गेले असा आरोप करण्यात येत आहे. मात्र यात काहीही तथ्य नाही. ईडीची नोटीस ही राज ठाकरे संजय राऊत, अनिल परब यांना देखील आली होती आणि असे असते तर हे सर्व नेते भाजपामध्ये आले असते. मात्र आपण पराक्रमी आहोत, असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
'ठाकरेंचा मुंबई महापालिकेत पराभव केल्याशिवाय शब्दरचना बदलणार नाही' : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिलेली मुलाखत म्हणचे जनतेची सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे एकाच शब्दरचनेचा वारंवार शब्दप्रयोग करतात की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा भाजपाचा डाव आहे. मात्र हे पाप करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, मात्र ठाकरे आता त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव हा काँग्रेसचा होता, तेव्हा भाजपा नव्हता. महाराष्ट्रापासून मुंबई कोणीही तोडू शकत नाही. मात्र ठाकरे हे एकच केसेट वारंवार वाजवतात. येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंना पराभूत व्हावे लागले की त्यांची ही शब्दरचना जरूर बदलेले, असेही मुनगंटीवार म्हणाले.
हेही वाचा - BJP Leaders Inquiry Issue : सत्तांतरानंतर भाजपाच्या संबंधित 'या' नेत्यांविरोधातील पोलीस तपास थंडावणार?