चंद्रपूर : (Chandrapur) बार्टी केंद्रात चालणारा भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय ईटीव्ही भारतने (BARTI Matter ETV Bharat Impact) चव्हाट्यावर आणला. याची सर्व माहिती बार्टी प्रशिक्षण केंद्राचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांना आहे. याबाबत आपण कायदेशीर चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र यानंतर त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे सुरू केले. अनेकदा संपर्क करूनही त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. कुठलीही चौकशी झाली नाही. याच दरम्यान बार्टी केंद्रात चालणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार समोर येऊ नये म्हणून ऐन प्रशिक्षण वर्ग (BARTI students honorarium) सुरू असताना हे केंद्र इतरत्र हलविण्याचा प्रताप केंद्राच्या संचालिका अनुपमा बुजाडे यांनी केला. वरून हात असल्याशिवाय हे शक्य नाही. महासंचालकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षाने भ्रष्टाचाराला पाठबळ मिळत असून, विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे.
उज्वल चांदेकरचे काम चंद्रपुरात, पगार नागपुरातुन : अनुपमा बुजाडे यांचे बार्टीचे चंद्रपूर आणि नागपूर येथे दोन केंद्र आहेत. नागपूरात व्यवस्थापक म्हणून चंद्रपुरात राहणारा उज्वल चांदेकर याच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. तर चंद्रपुरच्या केंद्राशी त्याचा काहीही संबंध नाही. मात्र चांदेकर नागपुरात जात नाही, अधिकार नसताना तो चंद्रपूर केंद्राचे काम बघतो. कुठेही प्रकरण समोर आल्यास त्याला 'मॅनेज' करण्याचे बुजाडे यांनी त्याला सर्व अधिकार दिले आहेत. यापूर्वी नागपुर केंद्राचे शिक्षकांच्या पगारात होत असल्याचे भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले असता ते उज्वल चांदेकर याने मॅनेज केले होते, असे व्यवहार करण्यासाठीच त्याला बुजाडे यांनी ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपुरातील बार्टीच्या विद्यार्थ्यांवर दमदाटी करणे, त्यांना धमकवणे, विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काचे प्रश्न विचारले की त्यांची मुस्कटदाबी करणे असे अनेक आरोप या चांदेकरवर आहेत, त्याची हकालपट्टी करण्याची मागणी (director eventual resignation) केली जात आहे.
अश्विन गोंगलेची बार्टीतुन गच्छंती : ईटीव्ही भारतने बार्टीत चालणाऱ्या गैरव्यवहाराबाबत बाब उजेडात आणल्यानंतर संचालिका बुजाडे यांना चौकशी झाली तर, मोठे घबाड समोर येण्याच्या भीतीने केंद्रात सारवासारव करण्याचे काम सुरू झाले. व्यवस्थापनाची जबाबदारी देणाऱ्या अश्विन गोंगले याला देखील सर्व दस्तऐवज करण्याचे काम देण्यात आले. सोबत बार्टीचे केंद्र देखील हलविण्यात येत होते. मात्र बुजाडे यांच्या अपेक्षेनुसार त्याने काम न केल्याचा ठपका ठेवत त्याला तडकाफडकी काढून टाकण्यात आले.
विद्यार्थी बंड करण्याच्या तयारीत : अनुसूचित जातीच्या मुलांना बार्टीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी शासनाकडून दर महा सहा हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो. सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण असते. फेब्रुवारी ते ऑगस्ट मध्ये हे प्रशिक्षण पार पडले. मात्र यातील अनेक विद्यार्थ्यांचे मानधन अजून मिळालेले नाही. यातील पहिल्या महिन्यातील मुलांचे तांत्रिक कारणामुळे मानधन अडले तर सहाव्या महिन्यातील काही मुलांना बाहेर निरोपसमारंभ केल्यामुळे जाणीवपूर्वक अनुपस्थित दाखवून मानधन रोखण्यात आले.
केंद्राच्या अडचणीत वाढ होणार : याबाबत विद्यार्थ्यांनी बार्टी प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका अनुपमा बुजाडे यांच्याकडे विचारणा केली की, त्यांच्यावर दबाब टाकून हा मुद्दा शमवला जात होता. मात्र याबाबतचा घोळ ईटीव्ही भारतने समोर आणला, हा विषय लावून धरला. त्यामुळे ज्यांना हे मानधन आता आपल्याला मिळणार नाही, ही अपेक्षा सोडलेल्या विद्यार्थ्यांत या अन्यायाची जाणीव निर्माण झाली. आता या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट केंद्रावर जाऊन जाब विचारणे सुरू केले. त्यामुळे या मुलांना एका महिन्यात सर्वांचे मानधन मिळून जाणार असे सांगण्यात आले, यावर विद्यार्थ्यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला तर, ईटीव्हीकडे जाऊन या संपूर्ण गैरप्रकाराचा पर्दाफाश करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे भविष्यात या केंद्राच्या अडचणीत वाढ होणार आहे.
अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मुलींचे खच्चीकरण : ज्या मुलींचे मानधन जाणीवपूर्वक रोखण्यात आले होत्या, त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना याचा पर्दाफाश केला होता. मात्र, भीतीपोटी त्यांनी कॅमेऱ्यासमोर आपली ओळख लपवली होती. मात्र, बार्टीच्या काही महानुभावांनी या मुलींची ओळख पटवली आणि सर्वांना मानधनाचे पैसे देऊ पण यांना आता पैसे मिळता कामा नये असा पवित्रा घेतला. त्यांना केवळ आश्वासन दिले जात होते. मात्र यापैकी एका मुलीने थेट केंद्रात जाऊन खडे बोल सुनावले आणि व्यवस्थापनाला चांगलेच धारेवर धरले. जोवर मानधन मिळत नाही तोवर मी आपल्याला सोडणार नाही अशी भूमिका तिने घेतली आहे.
विधानसभेत बार्टीचा प्रश्न समोर येण्याची शक्यता : बार्टीत चालणाऱ्या भोंगळ कारभाराबाबत लोकप्रतिनिधींना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. काही विद्यार्थी देखील अशा लोकप्रतिनिधिंना भेटून सर्व भोंगळ कारभाराबाबत माहिती देणार आहेत, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात चंद्रपुरातील बार्टीची सखोल चौकशी करण्याची मागणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.