चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखला जातो, मात्र 6 वर्षांनंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात दारूची दुकाने उघडी झाली. त्यामुळे, तळीरामांनी आणि दारुच्या दुकान मालकांनी आनंद व्यक्त केला आहे. एवढेच नाही, तर दारु बंदी उठवल्यामुळे एका दुकान मालकाने तर थेट जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा मोठा फोटो फ्रेम करून लावला आहे. वडेट्टीवार यांच्या फोटोची आरती केली.
विजय वडेट्टीवार आमच्यासाठी देव आहेत. जो उदरनिर्वाहासाठी आम्हाला मदत करतो, तोच आमचा देव आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रपूरातील बार आणि रेस्टॉरंटचा मालकाने दिली. तसेच विजय वडेट्टीवार यांनी चांगले काम केले आहे. ते आमच्यासाठी देवासमान आहेत. त्यांच्यामुळेच चंद्रपूरात आनंदाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.
अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. गेल्या सरकारने दारुबंदी केली. मात्र, अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. त्यामुळे दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले होते.
जिल्ह्यातील दारुबंदी सहा वर्षानंतर अखेर उठविण्यात आली. 8 जूनला याबाबत राज्य सरकारने शासन निर्णय काढून अधिकृत शिक्कामोर्तब केला. त्यामुळे जिल्ह्यातील बंद झालेली दारूची दुकाने, बार आणि रेस्टॉरंट सुरू झाली आहेत. मात्र, सहा वर्षे इथे दारुबंदी होती. दारुबंदी करण्यासाठी काही कारणे दिली गेली. तर ती उठविण्यासाठी देखील काही कारणांचा आधार देण्यात आला. एकंदरीत चंद्रपुर जिल्ह्याची दारुबंदी हटल्यामुळे यावर निर्भर रोजगार वाढेल, बाजारपेठ आणि इतर व्यवहारात देखील मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे.
2015 पासून होती दारूबंदी -
राज्याचे तत्कालीन अर्थमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची घोषणा केली. 1 एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली होती. जिल्ह्यात हळूहळू दारु तस्करांचे रॅकेट सक्रिय झाले. शेजारच्या नागपूर, यवतमाळ, भंडारा तसेच लगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात होती. राजकीय आशीर्वाद आणि काही पोलिसांच्या आशीर्वादाने हा व्यवसाय जोमात सुरू होता. तेव्हापासूनच जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. याबाबत तत्कालीन विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाम भूमिका घेतली होती. राज्यात सत्तापालट झाली आणि वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. जिल्ह्यातील दारुबंदी उठविणार अशी घोषणा त्यांनी केली होती.