चंद्रपूर - पाण्याची पातळी इतकी वाढेल की अनेक देश त्याखाली येण्याचा अहवाल आहे. जर आता आपण योग्य पाऊले उचलली तरच येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य आपण सुकर करू शकतो. आज सर्वाधिक तापमान बदल हा कोळशावर चालणारे वीज उत्पादन प्रकल्प आणि पेट्रोल-डिझलच्या प्रदूषणामुळे झाला आहे. या दोन्ही बाबीवर बांबू हाच एकमेव पर्याय आहे. कोळशाच्या जागी बांबूचे लाकूड (Bamboo) हे उत्तम पर्याय आहे, तर बांबूपासून इथेनॉल तयार होते. त्यामुळे बांबू उत्पादन (Bamboo farming) हे उद्याच्या शाश्वत विकासाचे भविष्य असल्याचे प्रतिपादन राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांनी केले. बांबू शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पाशा पटेल हे सध्या राज्यभर शेतकऱ्यांची कार्यशाळा घेत आहेत. ते चंद्रपुरात आले असताना त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला.
कोळशाला बांबूचाच पर्याय : भविष्यात कोळशाला बांबूचाच पर्याय उपलब्ध राहणार आहे. केवळ पर्यावरणाच्या दृष्टीनेच नव्हे, तर शेतकऱ्यांना पूरक उद्योग म्हणून आता बांबूची लागवड समोर येत आहे. त्यामुळे जुन्या पीक पद्धतीला फाटा देण्याची वेळ आली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने बांबू लागवड समजून घेतल्यास यातून सुजलाम भविष्यकाळाची निर्मिती होवू शकते. बांबू शेतीतून शाश्वत उत्पन्नाची हमी आहे. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारे हे रोपटे आहे. केवळ एकरी सात हजार इतका खर्च शेतकऱ्याला येतो. मात्र, याचे उत्पन्न आयुष्यभर आहे. विशेष म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत याची लागवड केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना हा उपयुक्त पर्याय आहे.
पाशा पटेल पुढे म्हणाले, ग्लोबल वार्मिंगमुळे संपूर्ण जग होरपळत चालले आहे. पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास देशाला, संपूर्ण जगाला गंभीर समस्येला सामोरे जावे लागणार आहे. देशातील पिढीला वाचवायचे असल्यास आजपासूनच प्रयत्नांची गरज आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो. एक बांबूचे झाड ३२० किलो ऑक्सिजन तयार करीत असते. तसेच हेच झाड सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. त्यामुळे तापमान कमी करण्यासाठी बांबू लागवड गरजेची आहे. बांबूपासून आकर्षक फर्निचर, विविध वस्तूंसोबतच कापड, टुथब्रश तयार केले जात आहेत. त्यामुळे बांबूला मोठी मागणी आहे. बांबू लागवडीमुळे सिंधदुर्ग जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी आर्थिक क्रांती झाली आहे. हीच क्रांती विदर्भातील घडू शकते. चंद्रपूर गडचिरोली सारख्या जिल्ह्यात बांबूची मोठ्या प्रमाणात नैसर्गिक उत्पादन होते, मात्र त्याची शेती केली जात नाही. या जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक आहे, ही स्थिती पालटण्यास बांबू शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. बांबूच्या लागवडीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नार मोठी भरही घालणार आहे.
बांबू आपल्या भविष्याला वाचवणारा पर्याय : 2027 मध्ये पेट्रोल आणि डिझलचा उपयोग देशात हद्दपार होणार आहे अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. भविष्यात बांबूपासून इथेनॉल आणि त्यातून बायोडिझेलची निर्मिती होणार आहे. नेदरलँड येथे 2022च्या अंती हा प्रकल्प सुरू होणार आहे, त्यात भारत सरकारचा समावेश आहे. आपल्या देशातही हा प्रकल्प येणार आहे. त्यामुळे बांबू हा आपल्या भविष्याला वाचविणारा पर्याय आहे, अशी माहिती माजी आमदार पाशा पटेल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.