चंद्रपूर- 'गोसेखुर्दचा कालवा तयार करण्यासाठी 35 वर्षे लागतात. सरकारला याची लाज वाटायला हवी. हेच काम आमच्या हातात असते तर ते अवघ्या तीन वर्षांत आम्ही करुन दाखविले असते. कारण त्यांच्यासारखे आम्ही भ्रष्टाचारी नाहीत' अशी सडकून टीका आम आदमी पक्षाचे संस्थापक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर केली. आम आदमी पक्षाच्या उमेदवार अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या प्रचारार्थ ब्रह्मपुरी येथे ते बोलत होते.
हेही वाचा- ऑनलाईन कॅम्पेनद्वारे देणगी मिळवण्यात 'वंचित' सर्वात आघाडीवर
आजवर तुम्ही कार्यकर्ते म्हणून पारंपरिक राजकीय पक्षाला मतदान केले. यावेळी आपल्या परिवाराचा विचार करुन आम आदमी पक्षाच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांना मतदान करा. जे दिल्लीत परिवर्तन घडले तेच परिवर्तन ब्रह्मपुरीत सुद्धा घडेल, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.
दिल्लीसारखा विकास पाहिजे असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा
केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. आम्ही जनतेला 200 युनिट वीज मोफत दिली. यात कुठलाही भेदभाव केला नाही. सरकारी शिक्षण आम्ही इतक्या चांगल्या दर्जाचे केले की श्रीमंत लोकदेखील आपल्या मुलांना महागड्या खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत टाकत आहेत. सरकारी शाळांचा निकाल हा खासगी शाळांपेक्षा चांगला लागत आहे. आम्ही खासगी शाळेच्या वाढत्या शुल्कावर नियंत्रण आणले. तुमचे रेशनकार्ड बनविण्यासाठी दिल्लीत दहावेळा चकरा मारण्याची गरज नाही. शासनाच्या प्रतिनिधी तुम्हाला हव्या त्या वेळी तुमच्या घरी येऊन हे काम करुन देतो. हे सर्व शक्य झाले. कारण दिल्लीच्या जनतेने आम्हावर विश्वास ठेवला. तुम्ही पारोमिता गोस्वामी यांच्यावर विश्वास ठेवा. ब्रम्हपुरीत खऱ्या अर्थाने क्रांती होईल. असेही केजरीवाल यावेळी म्हणाले.