चंद्रपूर - वेळेवर न आलेल्या पावसामुळे आधीच चिंतातुर झालेल्या शेतकऱ्याच्या समस्येत आता आणखी भर पडली. चिमूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी अंकुर कंपनीच्या सोयाबीनच्या वाणाची पेरणी केली जी उगवलीच नाही. यामुळे चिमूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाकडे तक्रार केली आहे.
चिमूर तालुक्यात बहुंताश शेती ही कोरडवाहू आहेत. त्यामूळे पाऊसाच्या पाण्यावर शेती निर्भर असून सततच्या अल्प पाऊसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रत्येक वेळेस चांगला पाऊस पडून चांगले पिक येईल या आशेवर शेतकरी मशागत व पेरणी करत असतो. या हंगामामध्ये उशीरा पाऊसाची सुरुवात झाली, यातच पेरण्या उरकण्याची सगळ्यांना लगबग झाली. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी नजिकच्या कृषी केंद्रातुन अंकुर या कंपनीच्या प्रभाकर या सोयाबिन वाणाची पेरणी केली . मात्र, ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्रभाकर या वाणाच्या लाट ( बॅच) क्रमांक १८९ - ३६५६१ ची खरेदी केली त्यांचे बी उगवलेच नसल्याचा प्रकार सामोर आला आहे . परिसरातील शेतकऱ्यांनी या विषयी परस्पर माहीती घेतली असता, प्रभाकर या सोयाबिन वाणाच्या समान बॅच क्रंमाकाची पेरणी केली ते उगवलीच नसल्याचे स्पष्ट झाले. दरवर्षी दुष्काळ परिस्थितीने घायकुतीला आलेल्या शेतकऱ्यांना मोठया आशेने पेरलेले बि उगवले नसल्याने जबर धक्का बसला आहे . यामुळे या सर्व शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन, त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.
या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप जिल्हा प्रमूख प्रशांत कोल्हे यांच्या नेतृत्वात उप विभागीय अधिकारी यांना निवेदन दिले. संबधित कंपनीवर त्वरीत कार्यवाही करावी, या बियाणास विक्री करता मंजूरी देणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी, याशिवाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
उप विभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने तालुका कृषी अधिकारी सुर्यवंशी, कृषी विस्तार अधिकारी श्रावण बोढे, शिवाजीराव टाकरस या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संबधीत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊण पाहणी केली व तपासणीकरता नमुने घेतले. तालुकास्तरीय समिती सदर प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहीती तालुका कृषी अधिकारी सुर्यवंशी यांनी दिली.