चंद्रपूर - 22 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेव्हापासून सलग दोन महिने लॉकडाऊनच्या झळा सोसणाऱ्या चंद्रपूर जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठ आजपासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी याबाबत निर्देश दिले होते. सकाळी दहा ते दुपारी दोन यादरम्यान ही दुकाने उघडी असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा... खुशखबर! बुलडाण्यानंतर आता भंडारा जिल्हादेखील कोरोनामुक्त
जीवनावश्यक सोयी सुविधा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले होते. यामध्ये बाजी मार्केट, किराणा दुकाने, मेडिकल, चिकन-मटण केंद्र आदींचा समावेश होता. मात्र, इतर दुकानांना अशी मुभा देण्यात आली नव्हती. यामुळे अनेकांचा व्यवसाय ठप्प झाला तर यावर निर्भर असलेली कुटुंबातील सदस्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. जिल्ह्यात केवळ एकच कोरोनाचा रुग्ण आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता आणावी, यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते. अशातच जिल्हा प्रशासनाने मोठा दिलासादायक निर्णय घेतला. सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व दुकानांना उघडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळी दहा वाजता शहरातील सर्व दुकाने उघडण्यात आली.
सकाळी दहा ते दुपारी 2 या दरम्यान ही दुकाने उघडी राहणार आहेत. सोमवार ते शनिवारपर्यंत ही दुकाने उघडी राहतील. यामध्ये कपड्याची दुकाने, मोबाईल रीचार्ज, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, चष्म्याची दुकाने, हेअर सलून तसेच इतर दुकानांचा समावेश आहे. एकंदरीत ठप्प पडलेला व्यवसायाचा गाडा आता पुन्हा सुरू झाला आहे. असे असले तरी विनाकारण बाहेर पडण्यास बंदी कायम आहे. यासोबतच लग्न समारंभासाठी देखील मोठी सूट देण्यात आली आहे. प्रशासनाच्या परवानगीने आता 50 लोक यात सामील होण्याची मुभा दिली आहे. पूर्वी ही परवानगी 20 लोकांची होती. परवानगीसाठी उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे.