चंद्रपूर - अतिवृष्टीमुळे बळीराजावर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर शासनकडून मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचे हात अजूनही रिकामेच आहेत. तर दुसरीकडे बळीराजाच्या मदतीला धावून येणाऱ्या कृषी विभागाच्या इमारतची अवस्था अत्यंत खराब आहे. या इमारतीला जागोजोगी तडे गेले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून येथील अधिकाऱ्यांना या इमारतीत काम करावे लागते.
हेही वाचा - वाघानं केली गाईची शिकार, थरार कॅमेऱ्यात कैद
गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे कृषी विभागाच्या मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आहे. या इमारतीतून तब्बल 24 गावांचा कारभार चालतो. तर या कार्यालयाची इमारत अतिशय जीर्ण झाली असून या ठिकाणी एकही अधिकारी वेळेवर सापडत नाही. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. घूस, उंदिरांनी कार्यालयात घरे केल्यामुळे अधून-मधून विषारी सापही कार्यालयात आढळून आले आहेत. त्यामुळे इमारतीत बसायला कर्मचारी घाबरतात. पावसाळ्यात शेती हंगामाला सुरूवात होते. मात्र, कार्यालयाला गळती लागत असल्याने कृषी कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतेत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले.
हेही वाचा - पक्षी सप्ताहनिमित्त इको-प्रो तर्फे विद्यार्थ्यांसाठी पक्षी निरीक्षण, स्वच्छता कार्यक्रम
कर्मचारीच कार्यालयात येत नसल्याने शेतकऱ्यांना कोणत्याही कामासाठी 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोंडपिपरी येथील तालुका कृषी कार्यालय गाठावे लागते. त्यामुळे येथे नवीन इमारतीचे बांधकाम करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला पाठवल्याची माहिती आहे. मात्र, अद्यापही इमारतीच्या बांधकामासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.